
आपला मुद्दा दिलेल्या वेळेत प्रभावीपणे मांडण्यासाठी बुलेट पॉइंट्ससारखा दुसरा उत्तम पर्याय नाही.
बऱ्याच लोकांना संभाषण करताना अशा अडचणी येतात की, ते जे सांगायचं असतं तो विषय सोडून इतर विषयांवर भरकटत जातात, दिलेल्या वेळापेक्षा अधिक वेळ बोलत राहतात, कधी कधी खूप जास्त उदाहरण देत बसतात.
काही जणांचे मात्र नेमके याच्या उलट होते. दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत त्यांचे बोलणे आटपते आणि मग उरलेल्या वेळात आता नक्की काय बोलायचे हा संभ्रम निर्माण होऊन आपले बोलणे अचानक थांबवतात. काही जणांना काही चांगले सुविचार, संस्कृत सुभाषिते किंवा शेरोशायरी आपल्या वक्तव्यात वापरायचे असतात, पण पाठ केलेले सगळे ते बोलताना मात्र विसरून जातात.
अशा प्रकारच्या सगळय़ा प्रश्नांवरचे एक हमखास उत्तर म्हणजे ‘बुलेट पॉइंट्स’. यासाठी आपण दिलेल्या वेळेच्या व्यवस्थापनानुसार आपल्याला हवे असणारे मुद्दे एखाद्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनवर किंवा एखाद्या कागदावर मोठय़ा फाँटमध्ये लिहून काढायला हवेत. मी टाइप करण्यापेक्षा ते स्वहस्ताक्षरात लिहावे असे मुद्दाम सुचवेन. कारण लिखाणामुळे ते मुद्दे आपल्या हस्ताक्षरात आपल्याला पटकन समजतात आणि लक्षातदेखील राहतात.
मुद्दय़ांवरून स्पष्टीकरण देण्याची कला जर आपल्याला आत्मसात असेल तर या पद्धतीचा अवलंब करून दिलेल्या मुद्दय़ांवर आपण आपले मत अतिशय योग्य प्रकारे मांडू शकता.
बुलेट पॉइंट्सचा वापर केल्यामुळे आपण दिलेल्या वेळेत ठरवलेले मुद्दे पूर्ण करू शकतो, पण याकरितासुद्धा तुम्हाला मोठय़ाने बोलून यासारख्या समोर उभे राहून केलेल्या सरावाची आवश्यकता असते.
तुम्ही मूळ ठिकाणी संभाषण करण्याअगोदर आपल्या स्क्रिप्टची नेट प्रॅक्टिस करायला हवी. म्हणजेच तुम्हाला घडय़ाळ लावून दिलेल्या बुलेट पॉइंट्सवरती प्रगटपणे (मनातल्या मनात नाही, तर प्रत्यक्ष बोलणार तसं) बोलून हे तपासून घ्यायला हवं की, बुलेट पॉइंट्सचा आधार घेऊनसुद्धा मी साधारण किती वेळात कोणता मुद्दा मांडतो कसा आहे. शक्य असल्यास याचं व्हिडीओ रेकार्ंडगदेखील करावे, जेणेकरून आपल्या देहबोलीतल्या मांडणीतल्या चुका आपल्याला कळतात. तोपर्यंत रेकॉर्ड किंवा शूट करत रहा, जोवर तुम्हाला तुमचे बेस्ट स्पीच गवसत नाही.
महत्त्वाच्या बुलेट पॉइंट्स ना तुम्ही अधोरेखित केल्यामुळे तुम्हाला मुख्य विषयावर आवश्यक तेवढा वेळ बोलता येते आणि इतर महत्त्वाचे नसलेले विषय पटकन आपले मत मांडून पूर्ण करता येतात.
बऱ्याच मोठय़ा राजकीय नेत्यांनी आणि कॉर्पोरेट मॅनेजर्सनी अतिशय प्रभावीपणे या पद्धतीचा वापर केलेला आहे. आपला मुद्दा दिलेल्या वेळेत प्रभावीपणे मांडण्यासाठी बुलेट पॉइंट्ससारखा दुसरा उत्तम पर्याय नाही. याचा योग्य सराव तुम्हाला उत्तम वक्ता बनण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो.
>> किरण खोत (निवेदक, सूत्रसंचालक)

























































