मोहोळमध्ये चालत्या रेल्वे इंजिनला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील घाटने गावाजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार बघायला मिळाला. बंगळुरूहून कन्याकुमारीकडे निघालेल्या ‘केके एक्प्रेस’च्या इंजिनला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

‘केके रेल्वे एक्प्रेस’च्या इंजिनला आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. चालकाला इंजिनच्या मागून येणारा धूर दिसू लागला. त्याने प्रसंगावधान साधून गाडी जागेवर थांबविली आणि आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला.

रेल्वेच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपासचे शेतकरी विश्वनाथ देशमुख, किशोर देशमुख, रामचंद्र चव्हाण, गणेश लाळे, अमृत देशमुख, प्रदीप गायकवाड, दादासाहेब वाघमोडे, सोमा बनसोडे, आनंद गुंड, राहुल गायकवाड, दिनेश गायकवाड आदींनी रेल्वेकडे धाव घेत आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती अग्निशमन यंत्रणेला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.