
रत्नागिरी तालुक्यातील वारे येथे भरधाव दुचाकीची धडक बसून पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय गोपाळ कुळ्ये (रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे, तर या अपघातात शैलेंद्र पंढरीनाथ वारेकर (35, रा. कोतवडे,रत्नागिरी) या पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री शैलेंद्र वारेकर वारे येथून चालत जात होता. त्याच सुमारास विजय कुळ्ये आपल्या ताब्यातील दुचाकीवरून भरधाव वेगाने गणपतीपुळे ते रत्नागिरी असा येत असताना त्याने पादचारी शैलेंद्रला जोरदार धडक देत अपघात केला. यात गंभीर जखमी झालेल्या शैलेंद्रला तेथील ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी शैलेंद्रला तपासून मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.