अमेरिकनांना गंडा घालणाऱ्या अलिबागच्या बोगस कॉलसेंटरवर छापा

प्रतिबंधित असलेली सेक्सवर्धक औषधे घरपोच उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलसेंटरचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परहूर येथील ‘नेचर्स एज’ या रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापेमारी केली असता त्या ठिकाणी कॉलसेंटर सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी 33 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.हे सर्व मुंबईमधील रहिवासी असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.

अलिबाग पोलिसांनी छापेमारी केली असता त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉलसेंटर सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची चौकशी केली असता या कॉलसेंटरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा घालत असल्याचे समोर आले. तसेच गिफ्ट कार्डद्वारे पेमेंट स्वीकारून हवालाच्या मदतीने हिंदुस्थानी चलनात आणत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रोहित बुटाने हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असून तो फरार आहे. पोलिसांनी रिसॉर्टमधून 31 कॉम्प्युटर, लॅपटॉपसह हेडफोन, की-बोर्ड, माऊस, इन्व्हर्टर, 5 चारचाकी वाहने व 1 मोटारसायकल, वायफाय युनिट मोडेम, 55 मोबाईल व इतर साहित्य जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी विनित चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लिंक, अॅप, कॉलवरून संपर्क
अमेरिकेतील नागरीकांसोबत संपर्क करण्यासाठी हे आरोपी अॅपवरुन लिंक पाठवून अमेरिकन यूएस फार्मा कंपनीचे प्रतिनीधी जॅान बोलत असल्याचे भासवून त्यांच्या कॅालवर संपर्क करत होते. नंतर अमेरिकेत प्रतिबंधित असलेल्या व्हायग्रा,सीयालीस, लिबिट्रो अशी औषधे घरपोच देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होते.