
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग असो की कुंभमेळा. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. मात्र कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना ५० कोटींची मदत देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. यंदा आंब्याच्या नुकसानीपोटी या सरकारने प्रती झाड २२० रुपये भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. कोकणातील मजूर प्रती दिवस आठशे रुपये मजुरी घेतो. त्याची तुलना केली, तर दिलेली नुकसान भरपाई एकप्रकारे थट्टाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा निर्णय येत्या शनिवारी रत्नागिरी येथील सभेत घेतला जाईल, असा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघ सिंधदुर्ग यांच्या एल्गार मेळाव्यात श्री. शेट्टी यांनी राज्य शासनाविरोधात पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. यावेळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष काका ढोके, वेंगुर्ले येथील आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, सुधीर जोशी, आप्पा अनभवणे, पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, राजेंद्र गडयानवार आदी उपस्थित होते.
राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भरपाईत झालेल्या फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर धडक द्यावी लागेल. त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. आपण कुणाच्या धमकीला घाबरायचे नाही. कोणाच्या दबावाला बळी पडायचे नाही. कोकणातील शेतकरी बांधवांच्या अस्तित्वासाठी ही लढाई लढत आहोत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने मुंबई येथे आले पाहिजे. त्याबरोबरच मुंबई येथे राहणाऱ्या आपल्या कोकणी बांधवांनाही एक दिवसाची सुट्टी काढून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी सांगितले पाहिजे. या धडक मोर्चाची तारीख येत्या शनिवारी रत्नागिरी येथे होणाऱ्या आंबा बागायतदारांच्या सभेत जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नासाठी आपण मुंबई येथील आंबा व्यापारीवर्गाशी थेट बोलून त्यांना समस्या सांगितली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबा बागायतदारांकडून यावेळी व्याजी रक्कम वसूल करण्यात येऊ नये. व्याजी रक्कम देण्याचा परवाना आपल्या कोणाकडे नाही. धाक दाखवून शेतकऱ्यांकडून वसुली केल्यास याद राखा, अशा शब्दात आपण त्यांना सुनावले आहे. तसेच इतर राज्यातील आंबा आणून त्यावर देवगड व रत्नागिरी आंबा म्हणून विक्री करण्याचा प्रकार घडला, तर असा प्रकार आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
याबाबत व्यापारीवर्गाने सकारात्मकता दाखविली असून यापुढे आंबा विक्रीवर नजर ठेवण्यासाठी खास पथकाची नेमणूक केली जाणार आहे. कटकारस्थान करून आंबा विक्री केली गेली आणि बाजारभाव पाडला, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. कुणाला अद्दल घडविण्यासाठी आपले आंदोलन नसून आपल्या व्यवसायाला नख लावणाऱ्या लोकांविरोधात आहे.
माजी आमदार बाळ माने म्हणाले, गर्दपेक्षा दर्दी शेतकरी महत्वाचा आहे. देवगडमध्ये उभारलेले हे आंदोलन आता संपूर्ण कोकणात पसरले आहे. या आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातील शेवटच्या मंडणगड तालुक्यापर्यंतच्या बांधवांचा पाठिंबा असेल. आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे. आपली ही चळवळ अशीच उभी राहिली पाहिजे. मुंबई येथील धडक मोर्चात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुशांत नाईक म्हणाले, सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. मदत जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे पंचनामे झाले नाहीत, मग शेतकरीवर्गाला मदत मिळणार तरी कशी? मुख्यमंत्री काल कणकवली येथे आले. कोकणातील जनतेसाठी काहीतरी देतील, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा दिसत नाही. त्यांना पुढील काळात आपण धडा शिकवला पाहिजे.
यावेळी काका ढोके, आप्पा अनभवणे, राजेंद्र गडयानवार, सुधीर जोशी, संजय गावडे, विजय कोंडकर, गणेश गावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किरण टेंबुलकर यांनी, तर सूत्रसंचालन सागर जोईल यांनी केले.


























































