
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मध्य, पश्चिम व दक्षिण मध्य रेल्वेने 10 गणपती स्पेशल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेऊन चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर केला आहे. दरम्यान, कोकण रेल्वेने या मार्गावर धावणाऱ्या आणखी 6 गणपती स्पेशल गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याने पाच दिवसांच्या गणरायांना निरोपी देऊन परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोकणात सर्वसाधारणपणे पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. या दरम्यान कोकणातील घराघरात गणराज विराजमान झालेले असतात. काही घरांमध्ये गौराईचेही आगमन झालेले असते. पाच दिवसांचा हा उत्सव साजरा केल्यानंतर गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे मुंबईकडे धावणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
परतीच्या प्रवासाला चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान चालविल्या जाणार आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असतानाच या मार्गावरील आणखी सहा गाड्यांना मुदतवाढ देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या चाकरमान्यांना सुखद धक्का दिला आहे. पश्चिम रेल्वेही गणेशभक्तांच्या मदतीला धावून आली आहे. पश्चिम रेल्वेनेही या मार्गावर गाड्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने विरार, वसई, बोरिवली या भागात राहणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला आहे.
कोकण रेल्वेने मुदत वाढ दिलेल्या गाड्यांमध्ये चिपळूण-पनवेल, पनवेल-सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी या गाड्यांचा समावेश आहे. चिपळूण-पनवेल,स्पेशल 15 सप्टेंबरपर्यंत धावणार होती. ही स्पेशल आता 20 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.
पनवेल-सावंतवाडी स्पेशल 15 सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार होती. ही स्पेशल 20 सप्टेंबरपर्यंत कोकण मार्गावर धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी स्पेशल 14 सप्टेंबरपर्यंत धावणार होती. या स्पेशललाही आणखी 2 दिवस मुदतवाढ देण्यात आली असून ही स्पेशल 16 सप्टेंबपर्यंत धावेल. या स्पेशल गाड्यांतून प्रवास करताना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





























































