
कोकण रेल्वे मार्गावरील आडवली रेल्वे स्थानकात नवीन लूपलाईन टाकण्यासाठी शुक्रवारी (27 डिसेंबरच्या) मध्यरात्रीपासून शनिवारी सकाळी पावणे आठ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेमार्गावरून धावणारी सर्व गाड्या विलंबाने धावत होत्या त्यामुळे कोकणात आणि गोव्यात निघालेल्या पर्यटकांचा खोळंबा झाला. मेगाब्लॉकमुळे निवसर ते विलवडे स्थानकांच्यादरम्यान रत्नागिरी ते राजापूरमधून पुढे जाणाऱ्या 10 गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मेगाब्लॉक मुळे मुंबईहून मडगावला जाणारी कोकणकन्या तीन तास उशीराने धावत होती. संगमेश्वर पर्यंत ही गाडी दीड तास उशीराने धावत होती. मेगाब्लॉकमुळे ही गाडी रत्नागिरीपासून पुढे तीन तास उशीराने धावत होती. दादर ते सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसही 2 तास 49 मिनिटे उशीराने धावत होती. सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ही गाडीही अडीच तास उशीराने धावत होती. रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीही रत्नागिरी स्थानकातून एक तास उशीराने सुटली. गरीब रथही एक तास उशीराने धावत होती. थर्टी फस्टसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात आणि गोव्यात जात असताना त्यांना मेगाब्लॉकचा फटका बसला आहे.
मेगाब्लॉकमुळे मुंबई – मंगलुरू एक्स्प्रेस, गांधीधाम – नागरकॉइल एक्स्प्रेस, कोचुवेली – डेहराडून एक्स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, एर्नाकुलम – हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, एलटीटी – मडगाव डबलडेकर, कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस, मडगाव – रत्नागिरी आणि रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर या दहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे
































































