
कोल्हापूरात तराफावरून शेतातील मोटर काढण्यास गेलेले पाच युवक आज तराफासह पुराच्या पाण्यात वाहुन जात होते. मात्र जाताना वजीर रेस्क्यू फोर्स व अन्य लोकांच्या मदतीने त्यांना वाचविण्यात यश आले. आज दुपारी एकच्या दरम्यान हा बचावाचा थरार शिरोळ तालुक्यात गणेशवाडी परिसरात घडला.
गणेशवाडी येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीपलीकडे म्हैसाळ हद्दीत आहे. सध्या कोयना धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. यामुळे गणेशवाडी येथील दीपक वास्कर, महेश कदम, राहुल गौरवाडे, उत्कर्ष खोत आणि वैभव वास्कर हे त्यांच्या म्हैसाळ हद्दीतील शेतातील इलेक्ट्रिक मोटारी काढण्यासाठी गेले होते. श्रावणी सोमवार निमित्त गणेशवाडीची नाव पूजेसाठी काठाला असल्याने 6 रिकाम्या प्लॅस्टिकच्या बॅरेलच्या तराफावरून हे युवक मोटर काढण्यासाठी गेले होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने तराफा वाहून जाऊ लागल्या. मात्र प्रसंगावधान राखत यातील एकाने वजीर रेस्क्यू फोर्सच्या रौफ पटेल यांना व्हिडिओ कॉलवरुन ही माहिती दिली. या रेस्क्यू फोर्स टीमने कुरुंदवाड घाटावरील आपत्तीकालीन यांत्रिक बोट काढून नदीतून गणेशवाडीकडे प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाऊन, प्रथम शिरटी गावाच्या आसपास त्या तराफावरील युवकांना गाठले. या सर्वांना गौरवाड पाणवठा येथे सुखरूप नदीकाठावर आणले. दरम्यान या युवकांना वाचवण्यासाठी यांत्रिक बोटीची व्यवस्था होईपर्यंत नृसिंहवाडी येथील लाकडी नावेचे नावाडी अरुण गावडे यांनीही जीव धोक्यात घालून नाव उलट प्रवाहात औरवाड पुलाकडे नेली होती.तब्बल दिड तास हा थरार सुरू होता.



























































