करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुर्नउभारणीस सुरुवात

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गरुड मंडप पुनउ&भारणीस सोमवारपासून (दि. 28) प्रत्यक्षात सुरुवात झाली. सध्या आठ लाकडी खांब उभारण्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत 48 खांबांसह कमान उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

गरुड मंडपाच्या खांबांना वाळवी लागल्याने या मंडपाची सुरक्षितता धोक्यात आली होती. नगारखानाही धोकादायक अवस्थेत होता. तर, मुजविलेले मनकर्णिका कुंड पुन्हा मोकळे करण्यात आले होते. त्यामुळे गरुड मंडपासह नगारखाना आणि मनकर्णिका कुंड पुनउ&भारणीचे काम करण्यासाठी गेल्या वर्षी देवस्थान समितीला 22 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता मिळाली होती. त्यानुसार या तिन्ही कामांच्या दुरुस्ती व सुधारणेस प्रारंभ झाला होता. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवापूर्वी गरुड मंडप उतरविण्यात आला होता. तर, नवरात्रोत्सवाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या गरुड मंडपात धार्मिक विधी झाले होते. यंदा नवरात्रोत्सवापूर्वी गरुड मंडप पूर्ववत उभारण्याचे नियोजन होते. त्यासाठी जानेवारी महिन्यात किरणोत्सव सोहळ्यानंतर पुन्हा गरुड मंडप कामास सुरुवात झाली.

कर्नाटकातील दांडेली येथून मागविलेल्या खास सागवानी लाकडापासून टेंबलाई मंदिर परिसरात 22 कुशल कारागिरांकडून पूर्वीच्या गरुड मंडपाप्रमाणे नक्षीदार खांब बनविण्यात आले आहेत. टेंबलाई टेकडी परिसरात याचे काम सुरू होते. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 45 फूट उंचीचा पत्र्याचा तात्पुरता मंडप उभारून मूळ 35 फूट उंचीच्या खांबांचा हा गरुड मंडप उभारण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या कामासाठी 12 कोटी 25 लाख रुपये स्वनिधीतून मंजूर केले आहेत. लाकडी खांब 100 वर्षांहून अधिक काळ टिकेल, यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. मनकर्णिका कुंडाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

दरम्यान, पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहने, तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी करवीरनिवासीनी श्री अंबाबाई मंदिरास भेट देऊन सर्व कामांचा आढावा घेतला.