श्रीअंबाबाई मंदिराच्या छतावरील एक हजार टन माती काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावरील एक हजार टन माती काढण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जाधव यांनी सांगितले की, अंबाबाई मंदिराच्या बांधकामापासून गेल्या हजार वर्षांत मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नव्हते. ते समितीने करून घेतले. त्यामध्ये मंदिराच्या छतावर एक हजार टन म्हणजे जवळजवळ 100 ट्रक माती असल्याचे स्पष्ट झाले. गळती काढण्यासाठी वेळोवेळी ही माती टाकण्यात आली आहे. यामुळे छतावरील ओझे वाढून छताला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे मंदिराच्या छतावरील मातीचे ओझे कमी करणे आवश्यक होते. त्यामुळे ही माती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माती काढल्यानंतर गळती बंद होणार असून, मंदिराचे मूळ स्वरूपही दिसणार आहे.

गरुड मंडपात लाकडी नक्षीकाम करणार

अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाला मूळ स्वरूप येण्यासाठी लाकडी नक्षीकाम करण्यात येणार असून, तेथील सर्व स्टील काढण्यात येणार आहे. दरम्यान, नृसिंहवाडी येथे एक कोटी रुपये खर्चून भक्तनिवास, तर कोल्हापुरात पार्ंकग व भक्तनिवास अशी सात मजली इमारत उभारण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले.

साडेसहाशे मंदिरांचे सर्वेक्षण पूर्ण

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित तीन हजारांवर मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत साडेसहाशे मंदिरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांत एक हजार मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. अनेक मंदिरांच्या परिसरात व देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यामुळे हे अतिक्रमण तातडीने हटवण्यात येणार आहे.