चुटकीवाला भोंदूबाबा ठाण्यात जेरबंद; कोल्हापूर पोलिसांची कारवाई, पाच दिवसांची पोलीस कोठडी

पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक गृहकलह अशा समस्या चुटकी वाजवत दूर करण्याचा दावा करत अनेकांची फसवणूक करणाऱया टिंबर मार्केट परिसरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर करवीर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. सनी भोसले असे या भोंदूबाबाचे नाव आहे.  न्यायालयाने भोंदूबाबा भोसलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सनी भोसलेच्या भोंदूगिरीचे अनेक कारनामे बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच तो पसार झाला होता. वाई, मुंबई, ठाणे अशा भागांत वावरत असल्याच्या माहितीनंतर करवीर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस तपासात त्याचे अनेक काळे कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरात चार खोल्यांच्या घरात दरबार भरवून, चुटकी वाजवत नागरिकांच्या समस्या दूर करण्याची भोंदूगिरी करत सनी भोसलेने गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसविले होते. कोल्हापूर जिह्यासह कर्नाटकातूनही लोक त्याच्याकडे येत होते. महिलांशी संवाद, संमोहित करण्याची कला या भोंदूबाबाचे वैशिष्टय़ होते. अनेक उच्चभ्रू महिलाही त्याच्या संपर्कात होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तक्रारी आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली होती.

महिलांच्या नावांवर सिमकार्ड

भोंदूबाबा सनी भोसले याने शिताफीने मोबाईलची सिमकार्ड अनेक महिलांच्या नावावर घेतले असून, त्याचाही तपास करवीर पोलीस करत आहेत. समाजातील अशा प्रवृत्तीला थारा न देता जनतेने सावध राहावे, असे आवाहनही कोल्हापूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.