
संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज सत्ताधारी राष्ट्रवादी, काँग्रेसने वर्चस्व राखले असले, तरी शिवसेनेला एक जागा देण्यावरून पडलेल्या ठिणगीने जिह्याच्या एकतर्फी राजकारणाला सुरूंग लावला आहे. दोन्ही सत्ताधारी काँग्रेस पुरस्कृत भाजप, जनसुराज्य आघाडीने 21 पैकी 17 जागांवर बाजी मारली असली, तरी शिवसेना, शेकाप व रिपाइं पुरस्कृत आघाडीने 3 जागांवर बाजी मारून सत्ताधाऱयांना चांगलाच इशारा दिला आहे. दरम्यान, अपक्षाला एकच जागा मिळाली आहे. तर, खासदार संजय मंडलिक, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने हे प्रमुख विजयी झाले असून, शिवसेनेचे अर्जुन आबीटकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा पराभव केला.
शिवसेनेचे विजयी उमेदवार
- खासदार संजय मंडलिक,
- बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर
- अर्जुन आबीटकर
मागून मिळाले नाही, ते आम्ही जिंकून घेऊन दाखवले
सन्मानाने मागितले; पण मिळाले नाही. तेच आता जिंकून दाखवले. त्यामुळे जिह्यासह बँकेच्या सत्ताकारणातसुद्धा शिवसेना किंगमेकर असेल. बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो, तरी पक्षाच्या आदेशानुसार पुढील भूमिका राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत खासदार संजय मंडलिक यांनी अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण केली आहे. तीन जागा दिल्या असत्या तर जिल्हा बँक बिनविरोध झाली असती. पण सत्तारुढ गटाने आम्हाला लढायला लावले. मागून मिळाले नाही, ते आम्ही जिंकून घेऊन दाखवले असेही ते म्हणाले. गेल्या सहा वर्षांत संचालक असलेले आपल्या संपर्कातील आताही संपर्कात येत असून, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेना आघाडीसोबत राहणार असल्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.































































