कोल्हापूर जिल्ह्यातील ‘लालपरी’ पूर्वपदावर, दैनंदिन महसूल 80 लाखांवर पोहोचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल पाच महिने कर्मचाऱयांच्या संपामुळे विस्कळीत झालेली एसटी बस वाहतूक आता पूर्वपदावर आल्याचे समाधानकारक चित्र आहे. सध्या उन्हाळी सुट्टय़ांसह लग्न, जत्रांमुळे सर्व बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. तर, एसटी बसही मार्गावर लागल्या आहेत. येथील एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने दैनंदिन महसूल 80 लाखांपर्यंत पोहोचला आहे.

कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून थांबलेले अर्थचक्र हळूहळू सुरू होत असतानाच, एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्याच्या प्रमुख व इतर मागण्यांसाठी ऐन दिवाळीत आणि पर्यटनाच्या हंगामात एसटी कर्मचाऱयांनी संप पुकारला. सरकारच्या आवाहनानंतर काही संपकरी कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावर हजर होऊनसुद्धा एसटीच्या फेऱया अत्यल्प होत्या. अखेर न्यायालयीन हस्तक्षेपामुळे 25 एप्रिलनंतर संपातील कर्मचारी मोठय़ा संख्येने कामावर हजर होऊ लागले. त्यानंतर एसटीची बससेवा विविध मार्गांवर पूर्ववत सुरू झाली. कोल्हापूर विभागात जिल्हा आणि जिह्यांतर्गत असे एसटीचे सुमारे 450 मार्ग आहेत. जिह्यात सर्व आगारांत सुमारे 750 बसेस आहेत. त्यातील तांत्रिक दोष आदी कारणांमुळे दररोज 50च्या आसपास बस आगारात दुरुस्तीसाठी थांबलेल्या असतात. सध्या यापैकी 650 हून अधिक एसटी बसेस मार्गावर धावत आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी, लग्नसराई, यात्रा, जत्रा आदी अन्य कार्यक्रमांमुळे एसटीची मागणी वाढत आहे. त्यामुळे एरव्ही 50 ते 60 लाखांपर्यंतचे दैनंदिन उत्पन्न सध्या 80 लाखांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.

पुणे, मुंबई, अलिबाग, संभाजीनगर, नाशिक या मार्गांवर अधिकाधिक एसटीच्या फेऱया वाढलेल्या आहेत. उन्हाची तीव्रता तसेच प्रवासीसंख्या एक लाखापेक्षा अधिक असल्याने, लांब पल्ल्यासाठी एसटीची मागणी होत आहे. जिह्यातील सर्व आगारांत 45 वातानुकूलित शिवशाहीच्या बसेस आहेत. तर, नवीन मार्गांवर एसटी बस सुरू करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.