कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालातही मुलीच हुशार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दुपारी इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. राज्यातील नऊ विभागांत कोल्हापूर विभाग 98.50 टक्के गुणांसह दुसऱया स्थानी राहिला. तर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिह्यांचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागात 98.94 टक्के गुणांसह कोल्हापूर जिल्हा प्रथम आला. सातारा 98.29 टक्क्यांसह दुसऱया क्रमांकावर आणि सांगली जिल्हा 98.10 टक्क्यांसह तिसऱया क्रमांकावर राहिला.
2020 साली कोल्हापूर विभागाची टक्केवारी 97.64 होती. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. यामध्ये 99.92 टक्यांसह राज्यात पाचव्या स्थानी हा विभाग होता. 2020च्या तुलनेत यंदा निकालात 0.86 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले.
मार्च-एप्रिल 2022मध्ये झालेल्या या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 66 विषयांची परीक्षा घेण्यात आली. सातारा 732, सांगली 650 व कोल्हापूर जिह्यातील 928 अशा एकूण दोन हजार 310 माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी 355 केंद्र व दोन हजार 108 उपकेंद्रांत परीक्षा दिली. सातारा जिह्यात 38 हजार 601पैकी 37 हजार 944, सांगली जिह्यातील 38 हजार 301पैकी 37 हजार 576, कोल्हापूर जिह्यातील 53 हजार 933पैकी 53 हजार 364 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.