कोल्हापूर – 84 लाखांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला अटक

नोकरी व ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून अनेक लोकांची ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या व्हीजन ग्रीन ऍग्रो प्रॉडक्ट व व्ही अँड के ॲग्रोटेक प्रॉडक्ट या कंपनीचा संचालक सुशील शिवाजी पाटील (रा.यवलूज,ता.पन्हाळा) याला आज आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या फसवणुकीतील मुख्य सुत्रधार विकास खुडे व त्याची पत्नी विद्या खुडेसह संचालक प्रसाद पाटील, डॉ. तुकाराम पाटील हे चौघेही फरारी असून अजुनही पोलिसांना सापडलेले नाहीत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संबंधित बनावट कंपनीची स्थापना करून विकास खुडे, त्याची पत्नी विद्या खुडे,संचालक सुशील पाटील, प्रसाद पाटील व तुकाराम पाटील यांनी राजू बळीराम सूर्यवंशी (४८,रा.लक्षतीर्थ वसाहत) यांच्यासह हजारो गुंतवणूकदारांची ८४ लाख ५६ हजार २०० रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी दि.१६ सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यांत या पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीच्या या गुन्ह्याची व्याप्ती असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या या संशयितांपैकी यवलुज येथील सुशील पाटील हा राहत्या घरातील पोटमाळ्यावर लपून बसल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती.त्यानुसार पोलीसांनी सुशील पाटील याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली.न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कंपनीचे कार्यालय तसेच विकास खुडे याच्या पोर्ले येथील घरातून महत्वाची कागदपत्रे हस्तगत केल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या