कोल्हापूर – तहसीलदारांच्या बनावट सही, शिक्क्याने फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तहसीलदारांचे बनावट सही, शिक्के बनवून बिगरशेतीची बनावट कागदपत्रे व खोटे ‘एनए’चे आदेश काढणाऱ्या गजानन रवींद्र पाटील (वय – 33, रा. शिवाजी गल्ली, कणेरी, ता. करवीर) या भामट्याला आज गोकुळ शिरगाव पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून संगणक, प्रिंटर सहित बनावट शिक्केही हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेर्ली (ता. करवीर) येथील एका महिलेच्या मालकीच्या जमिनीची बिगरशेती आदेशाची तापसणी करताना करवीर मंडल अधिकारी दीपक पिंगळे यांना संशय आला. चौकशीत संबंधित आदेश खोट्या सही, शिक्याने देण्यात आल्याचे समोर आले. हा आदेश संशयीत आरोपी गजानन पाटील याने आपण जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी करीत असल्याची बतावणी करून दिल्याचेही चौकशीत समोर आल्याने मंडल अधिकारी पिंगळे यांनी पाटील याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन पाटील याने बिगर शेतीचे बनावट आदेश बनवून करवीर तालुक्यातील अनेक भूधारकांची फसवणूक केल्याचे तपासात समोर येत आहे. पाटील याने करवीर तहसील कार्यालयाचा बनावट शिक्का घरीच मशिनच्या सहाय्याने बनविला होता. तसेच तहसिलदार सचिन गिरी व शितल मुळे-भामरे यांची बोगस सहीसुद्धा त्याने केली होती. याप्रकरणी सहाय्यक पो. निरिक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक फौजदार मानसिंग राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव पवार हे अधिक तपास करत आहेत.