
कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलाव जसा पर्यटकांना भुरळ घालणारा आहे, तसाच तो निसर्गचक्र आणि जैवविविधतेचाही महत्त्वाचा घटक आहे. रंकाळय़ाच्या संवर्धनाचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण याच तलावाचा एक मुख्य घटक असलेल्या परताळा परिसरात पुन्हा एकदा बांधकामाचा घाट घातल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, याविरोधात रंकाळाप्रेमींकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. रंकाळा तलावाच्या परताळा परिसरात खासगी मालकाने लावलेल्या फलकामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
ऐतिहासिक रंकाळा तलाव कोल्हापूरचे वैभव आहे. हा तलाव बंदिस्त करत असताना, यातील जैवविविधतेच्या संवर्धन व वाढीसाठी त्यावेळच्या तज्ञांनी विचारपूर्वकपणे परताळा हा भाग राखून ठेवला आहे. पावसाळ्यात रंकाळ्यामधील सर्व प्रकारच्या जलचरांसाठी ते प्रजोत्पादनाचे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत रंकाळा तलावाशेजारी झालेली मोठमोठी बांधकामे व त्यातून तलावात मिसळणाऱया सांडपाण्यामुळे मृत होणारे जलचर तसेच केंदाळामुळे एकीकडे रंकाळा तलाव वारंवार मरणासन्न अवस्थेत गेल्याचे चित्र होते. रंकाळा तलाव वाचावा, यासाठी संवर्धनाचे उपाय म्हणून आजपर्यंत कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. अनेक प्रयोगही करण्यात आले. त्यामुळे आता कुठे रंकाळा तलावाचे सौंदर्य खुलत असतानाच, पुन्हा एकदा या तलावाच्या परताळय़ात काहीजणांनी बांधकामाचा घाट घातल्याचे दिसून येऊ लागले आहे. यापूर्वीही झालेला हा प्रकार कोल्हापूरकरांनी उधळून लावला होता. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्या परिसराकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष पाहाता, पुन्हा एकदा परताळ्यात बांधकाम करण्याच्या हालचाली दिसून येऊ लागल्या आहेत.
परताळय़ात बांधकाम परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रंकाळा संवर्धन, संरक्षण समितीचे अशोक देसाई, विकास जाधव, अभिजित चौगुले, संजय मांगलेकर, यशवंत पाटील, जितेंद्र लोहार, प्रशांत जाधव, देवेंद्र रासकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिला आहे.
परताळा परिसरात अवजड वाहनांची वाहतूक
रंकाळा व परताळा यांना जोडणाऱया ओढय़ाचे रूंद पात्र बुजवून तिथे केवळ दोन फुटी तीन-चार पाईप टाकल्याने रंकाळ्यातील जलचरांना प्रजोत्पादनासाठी परताळ्यामध्ये येण्यास अटकाव होत आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे परताळ्यात इमारतींच्या पाडकामाची खरमाती आणि कचरा ट्रकद्वारे येथे टाकला जात आहे. शिवाय परताळा परिसर सायलेंट झोन असल्याने येथे अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र, तेथे बॅरिकेट्स नसल्याने सर्रासपणे येथे अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे, असे रंकाळा संवर्धन, संरक्षण समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले.
एकीकडे कोल्हापूर महापालिकेने रंकाळा तलावाच्या परताळा परिसरात खरमाती, कचरा टाकू नये; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फलक लावला आहे. तरीही एका कुटुंबीयाने संबंधित जागा ही खासगी असून, यावर कोणतेही शासकीय आरक्षण नाही. येथे अतिक्रमण वा बेकायदेशीर कृत्य करणाऱयांवर कारवाईचा इशारा देणारा फलक लावल्याने खळबळ उडाली आहे.



























































