
महाबळेश्वर कोरोनामुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून, विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये आता खास शिबिराचे आयोजन केले आहे. तेथील रहिवाशांची एकाचवेळी कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रयत्न करूनही कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. याबरोबरच हॉटस्पॉट ठरलेल्या विविध गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये खास कोरोना शिबिराचे आयोजन करून तेथील सर्व नागरिकांची एकाच वेळी तपासणी तपासणी करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली.
या मास टेस्टिंगचा शुभारंभ मंगळवारी मुख्याधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत कारवी आळी येथे करण्यात आला. 50 पैकी तीन महिला व तीन पुरुष असे सहाजणांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याने त्यांना तातडीने होम आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले आहे. यानंतर गणेशनगर सोसायटी, दत्तनगर सोसायटी, अंबिका व नामदेव सोयायटी, मुन्वर सोसायटी, जन्नीमाता सोसायटी, जिजामाता सोसायटी अशा ठिकाणी तपासणी होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
































































