कोल्हापुरातील पंचगंगेची उपनदी जयंती ‘नाला’ पावसाच्या प्रतिक्षेत, नदीत मिसळणार तुंबलेली घाण; आरोग्याचा प्रश्न गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरला वरदान असलेल्या पंचगंगा नदीची उपनदी जयंती नदीचा नाला झाला तरीसुद्धा स्वच्छतेअभावी दिवसेंदिवस अवस्था बिकट होत आहे. दोन-दोन आठवडे प्लॅस्टिक कचरा काढूनही घाण ‘जैसे थे’च दिसून येत आहे. आता तर कोणत्याही क्षणी शहरात वळवाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जयंती नाला पुलापलीकडे वाहून गेलेला मोठय़ा प्रमाणातील प्लॅस्टिकचा कचरा तसेच गेल्या दोन-तीन आठवडय़ापासून तुंबलेले सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळणार आहे. परिणामी राजाराम बंधारापासून पुढील गावांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

कात्यायनी मंदिर परिसरात उगम पावणारी आणि पंचगंगा नदीची उपनदी म्हणून उल्लेख असलेली जयंती नदी गेल्या 25-30 वर्षांत शहराचा सांडपाणी वाहून नेणारा नाला झाला. आता तर जबाबदार लोकप्रतिनिधी, कोल्हापूरकर, महानगरपालिका प्रशासन ते प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचे कसलेही सुयर-सूतक नसल्याचे दिसून येत आहे.
प्लॅस्टिक, थर्माकोलचा कचरा भरून वाहणारा हा नाला साफ करून महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी दमले. मात्र, घाण करणाऱया प्रवृत्तींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपूर्वी या नाल्यामध्ये वाहून आलेल्या प्लॅस्टिकचा कचरा काढण्यासच महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांना दोन ते तीन आठवडे लागले. यातील प्लॅस्टिकचा काही कचरा हा जयंती पुलाच्या पलीकडे पंचगंगा नदीत मिसळण्याच्या मार्गापर्यंत वाहून गेला आहे. तो अजूनही तिथेच पडून आहे.

जयंती नाल्यातील सांडपाणी तुंबून राहिल्याने दुर्गंधीही सुटली आहे. सध्या सर्वत्र पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, कोणत्याही क्षणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जर वेळीच हा नाला साफ केला नाही, तर साचलेले आणि दुर्गंधीयुक्त सांडपाणी पावसामुळे थेट पंचगंगा नदीत मिसळण्याची भीती आहे. परिणामी राजाराम बंधारापासून पुढील गावातील नागरिकांच्या आरोग्याला या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास भोगावा लागणार असल्याचे चित्र आहे.