
कोल्हापूर जिल्ह्यात मान्सुनने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अधे-मधे हलक्या स्वरुपात कोसळणाऱ्या पावसाने,आज मात्र कोल्हापूरकरांची चांगलीच दैना उडवली. पहाटेपासून, दुपारपर्यंत काहीशी विश्रांती घेत कोसळणाऱ्या संततधार पावसाने, जनजीवन विस्कळीत झाले होते.
काल दिवसभरात अधुनमधून हलक्या सरीने पावसाने हजेरी लावली होती. तर आज पहाटे पासुनच धुवांधार पावसाने कोल्हापूरकरांना चांगलेच जखडुन ठेवले.पहाटे पासून संततधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दिवसभरात अल्प विश्रांती घेत, अधुनमधून पावसाची संततधार सुरुच राहिल्याने, जनजीवनावर त्याचा परिणाम झाला.दिवसभरात सूर्याचे दर्शन होऊ शकले नाही.
दरम्यान जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार गगनबावडा तालुक्यात 89.59 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले -3, शिरोळ-1.29, पन्हाळा-21.29, शाहुवाडी- 24.50, राधानगरी- 45.50, करवीर-17.82, कागल-30, गडहिंग्लज- 3.81, भुदरगड- 20, आजरा- 25 तर चंदगड तालुक्यात 34.17 मिमी पावसाची नोंद झाली आहे.




























































