
प्रसिद्ध गिर्यारोहक खुशी विनोद कांबोज ची “स्टेपिंग स्टोन” कोकणकडा, ही चित्रफित इंडियन मौनटैनीरिंग फौंडेशन येथे झालेल्या, माउंटन फिल्म फेस्टिवल मध्ये द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आली.महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाच्या इतिहासात या सुवर्णक्षणामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
इंडियन माउंटेनरिंग फाउंडेशन (आय.एम.एफ.) ही हिंदुस्थानातील गिर्यारोहणाची शिखर संस्था असून,प्रत्येक वर्षी गिर्यारोहण,साहसी खेळ आणि पर्यावरणावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म शो चे आयोजन केले जाते.जगभरातील दिग्गज व्यक्तींनी केलेल्या विविध मोहिमांच्या फिल्म्स आय.एम.एफ.कडे येतात.त्यातील मोजक्याच फिल्म या फेस्टिवल साठी निवडल्या जातात. यावर्षी फक्त 17 फिल्म निवडल्या गेल्या होत्या.यामध्येच “स्टेपिंग स्टोन” कोकणकडा, या चित्रफितीचा समावेश झाला होता.
प्रस्तरारोहण हा महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाचा आत्मा आहे. हिंदुस्थानात पहिल्यांदा हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर यशस्वी आरोहन करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहीका, कोल्हापूरची खुशी कांबोज आणि तासगाव(सांगली) ची अरमान मुजावर यांची “स्टेपिंग स्टोन” कोकणकडा, ही फिल्म आय.एम.एफ.माउंटन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होण्यासाठी निवडण्यात आली होती.महाराष्ट्रातून पुणे व मुंबई येथून काही चित्रफिती यापूर्वी प्रदर्शित झाल्या होत्या.त्या प्रामुख्याने हिमालयातील होत्या.सह्याद्रीतील प्रस्तरारोहणावरील त्यातही मुलींनी केलेल्या प्रथम चढाई मोहिमेची फिल्म प्रदर्शित होण्याचा मान यावर्षी पहिल्यांदाच कोकणकडा चित्रफितीला मिळाला आहे. खुशी कांबोज आणि अरमान मुजावर ने यशस्वी केलेल्या, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड अशा कोकण कडा मोहिमेमुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राला, गिर्यारोहणातील चित्रफीत दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचा मान यानिमित्ताने प्रथमच मिळला आहे.
आय.एम.एफ.च्या ऑडिटोरियम मध्ये,दि.14 डिसेंबरला स्टेपिंग स्टोन चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.त्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात या चित्रफितीला द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.यावेळी खूशी कांबोज,अरमान मुजावर यांच्यासह ज्यांनी ही चित्रफीत तयार केली ते नीरज पाटील आणि या मोहिमेचे नेतृत्व करणारे गणेश गीध हे दिल्लीत उपस्थित होते.

























































