कळंबा मध्यवर्ती कारागृहाची कडक सुरक्षा यंत्रणा भेदून कारागृहात पुन्हा एकदा मोबाईल आढळले आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत झाडाझडतीच्या मोहिमेत तब्बल 46 मोबाईल आणि चार्जर तुरुंगात आढळून आले. तुरुंगाधिकारी अविनाश जयसिंग भोई (वय 42, रा. कळंबा कारागृह क्वॉर्टर्स, कळंबा) यांनी सुमारे 35 हजारांचा मुद्देमाल जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देत फिर्याद दिली आहे. दरम्यान, मोबाईलचा वापर केलेल्या कैद्यांचा शोध घेण्याचे काम आता पोलिसांना करावे लागणार आहे.
कळंबा कारागृहात यापूर्वीही अनेकवेळा मोबाईल आढळून आले आहेत. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन तुरुंगाधिकारी व कर्मचाऱयांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतरही मे महिन्यामध्ये कारागृहात 29 मोबाईल, 36 बॅटरी, 27 चार्ंजग केबल, दहा पेन ड्राईव्ह, दोन डोंगल आणि हेडफोन जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी कारागृहातील 11 अधिकाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. तरीसुद्धा कारागृहाची सुरक्षा यंत्रणा भेदून मोबाईल आढळून येत असल्याने कारागृह प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृह म्हणजे अनेक गैरप्रकारांचा अड्डाच बनले आहे. कारागृहात अमली पदार्थांपासून मोबाईल, गांजा पोहोचवणारी टोळीच कार्यरत आहे. गांजाच्या आर्थिक वादातूनच महिनाभरापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील एका गुन्हेगाराचा कारागृहात खून झाला होता. यापूर्वीही कारागृहात अनेक गैरप्रकार घडले आहेत. कारागृहातील ढिसाळ सुरक्षेमुळेच या गोष्टी घडत असल्याने जवळपास 14 कर्मचाऱयांना दोषी धरून निलंबित केले होते.
सध्या कारागृहाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांच्याकडे पदभार आहे. कैद्यांच्या बरॅकची दररोज झाडाझडती घेतली जाते. कैद्यांचे साहित्य, कपडे तपासले जातात. त्यावेळी काहीच संशयास्पद वस्तू सापडत नाहीत; पण स्वच्छतागृह, सार्वजनिक स्नानगृह या ठिकाणी लपवलेले मोबाईल सापडत असल्याने ‘हे मोबाईल आणते कोण?’ असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. यामध्ये सिमकार्ड नसल्याने ते कोणाचे आहेत, कोणी वापरले हे समजत नाही.
गेल्या तीन महिन्यांत कारागृहातील सुरक्षारक्षकांनी झाडाझडती घेऊन 46 मोबाईल शोधून काढले आहेत. ते एकत्र करून बुधवारी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या मोबाईलची किंमत 35 हजार रुपये आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तपास करीत आहेत.