
ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील वादग्रस्त अतिक्रमण हटवण्यावरुन वातावरण तापले आहे. विविध हिंदुत्वादी संघटना तसेच संभाजीराचे छत्रपती यांनी या प्रकरणी आक्रमक भुमिका घेतली आहे. रायगडानंतर स्वराज्याची राजधानी असलेल्या विशाळगडाला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी “चलो विशाळगड”चा नारा त्यांनी दिला होता. मात्र मिंधे सरकारने अतिक्रमण हटलवण्याबाबत दुर्लक्ष केले. आंदोलनासाठी संभाजीराजे छत्रपती रविवारी गडावर येण्यापूर्वी जाळपोळ, दगडफेक आणि हल्ला केल्याच्या घटना घडल्याने वातावरण चिघळले. त्यामुळे संभाजीराजे यांना उशिरापर्यंत गडावरच अडकून पडावे लागले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना संकटातून वाचविणारा विशाळगड अतिक्रमणाच्या संकटात अडकला आहे. विशाळगडावरील 158 हून अधिक अतिक्रमण हटवण्यासाठी एक कोटी 64 लाखांची निधी मंजूर करण्यात आला. परंतु मिंधे सरकार आणि जिल्हा प्रशासनाने गेल्या दीड वर्षात अतिक्रण हटवण्यासंदर्भात कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळेच संभाजीराजे छत्रपती तसेच विविध हिंदुत्वादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत गडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी चलो विशाळगडचा नारा दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून परिसरात जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र शांततेत आंदोलन सुरू होण्यापूर्वीच विशाळगडावर आंदोलनाला हिंसक वळण लागले.
गडावर असलेल्या काही समाजकंटकांनी गडावरील प्रार्थना स्थळासह काही घरांवर दगडफेक केली. शस्त्रे घेऊन गडावर दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू होती. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या खांद्यावर तलवारीचा वार करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. भर पावसात गडावर जाळपोळीच्या घटना घडल्या, शांततेत आंदोलन सुरू होण्यापूर्वीच गडावर हिंसक घटना घडल्या. त्यामुळे गृह खात्याच्या कारभारावर पून्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “विशाळगडावरील मलिक रिहान दर्गा हा एक हजार वर्षांपूर्वीचा असून, त्याची गॅझेटमध्ये नोंद आहे. हा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. त्यामुळे या दर्ग्यावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. सीसीटीव्ही पाहून त्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच अतिक्रण व अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व जातीच्या लोकांचे अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजाचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही.” अस मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमण गणी आजरेकर यांनी म्हटल आहे.