
राज्याच्या प्रमुख महोत्सवात समावेश केलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा काल सायंकाळी थाटात शुभारंभ झाला. एकीकडे या सोहळ्यासाठी निधीची कसलीही तरतूद नसल्याने हा सोहळा होणार की नाही, अशी शंका असताना, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने जोखीम पत्करून या सोहळ्याचे नियोजन केले. मात्र, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि खासदार धनंजय महाडिक वगळता खुद्द उद्घाटक तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीयमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील इतर खासदार, आमदार या सोहळ्याकडे फिरकले नाहीत. यामुळे महायुतीच्या आमदार, खासदारांना या राज्य महोत्सवाचे कसलेही गांभीर्य नसल्याची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
देशात मैसूरपाठोपाठ कोल्हापुरातील करवीर संस्थानच्या शाही दसरा सोहळ्यास महत्त्व आहे. पारंपरिक शाही लवाजम्यासह होणारा हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक दाखल होतात. या वर्षीपासून राज्य सरकारने राजाच्या प्रमुख महोत्सवांत शाही दसऱ्याचा समावेश केला आहे. मात्र, महोत्सवासाठी निधीची तरतूद नसल्याने हा सोहळा होणार की नाही, अशी शक्यता होती. जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दसरा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांचा कोल्हापूर दौरा झाला; पण त्यांनी या सोहळ्याच्या निधीबाबत ठोस वाच्यता केली नाही. पालकमंत्र्यांकडूनही निधीबाबत ठोस आश्वासन दिले नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. महोत्सवासाठी निधीची अनिश्चितता असतानाही जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांच्या भरगच्च अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदार, खासदार तसेच पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाकडून निमंत्रण देण्यात आले होते.
या सोहळ्याचा शुभारंभ सोमवारी ऐतिहासिक दसरा चौक येथील भव्य मंडपात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व लोकसभा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता; पण पालकमंत्री सोहळ्याला फिरकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची उपस्थिती अपेक्षित होती; पण त्याही आल्या नाहीत. शिवाय जिल्ह्यातील महायुतीचे सर्व दहा आमदार या सोहळ्याला फिरकले नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना होती.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जि.प.चे सीईओ कार्तिकेयन एस., अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार स्वप्नील रावडे, तेजस्विनी पाटील यांच्या उपस्थितीत या सोहळ्यास सुरुवात झाली असली, तरी जबाबदार लोकप्रतिनिधींनी फिरवलेली पाठ पाहाता हा कोणाचा राज्योत्सव, अशी चर्चा होऊ लागली आहे.