
शककर्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती जिल्ह्यात विविध पारंपरिक व सामाजिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजन्म काळ सोहळा, शिवकालीन महानाट्य, भव्य मिरवणूक आणि विविध मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसह भगव्या पताका, भगवे ध्वज अशा सळसळत्या वातावरणात सर्वजण शिवमय झाले होते.
छत्रपती घराण्याकडून पारंपरिक शिवजन्म सोहळा
छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत ऐतिहासिक भवानी मंडपातून परंपरेनुसार सकाळी शाही लवाजम्या – सह पालखीत शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक नर्सरी बागेपर्यंत काढण्यात आली.शाही लवाजम्यासह पारंपरिक वाद्यांचा गजर,’जय भवानी, जय शिवराय’ घोषणांसह परिसर दुमदुमला होता. येथील शाहुकालीन शिवमंदिरात वैदिक पुजा-यांच्या उपस्थित खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि युवराजकुमार यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवजन्म सोहळा साजरा पार पडला. करवीर संस्थानच्या छत्रपती राजघराण्याच्या वतीने आयोजित या शिवजयंती सोहळ्यात मानकऱ्यांसह शिवशाहू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नर्सरी बागेत हे शहरातील एकमेव दुमजली दगडी शिवमंदिर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सन १९११ मध्ये बांधले असून, सूबक बांधकाम असलेल्या या मंदिरात शिवरायांच्या पादुकांची नित्यपूजा घाटगे कुटुंब संस्थान काळापासून सुरू आहे. या मंदिराजवळच छत्रपती ताराराणींचेही मंदिर असून, नुकतेच या दोन्ही मंदिरांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून छत्रपती ताराराणी यांनाही यावेळी अभिवादन करण्यात आले.

























































