कोल्हापूरात पावसाचा जोर कायम; पाच बंधारे पाण्याखाली

524

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 15-20 दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांत बरसायला सुरुवात केली आहे. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर मंगळवारीही कायम आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत सकाळपर्यंत तब्बल चार फुटांची वाढ झाली आहे. तर पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 137 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यंदा जिल्ह्यात मॉन्सून वेळेत दाखल झाला होता. जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले होते. धरणेही 60 ते 65 टक्के भरली होती. मात्र, 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. काही भागात पिके वाळू लागल्याने बळीराजा धास्तावला होता. आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाल्याने शेत शिवारात शेतीकामासाठी लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात हातकणंगले 7.50,शिरोळ 3.86, पन्हाळा 49, शाहूवाडी 43.67, राधानगरी 55, गगनबावडा 137, करवीर 29.09,कागल39.86, गडहिंग्लज 27.14,भुदरगड 36,आजरा 62.75, चंदगड 72.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोयनेतून 1 हजार 139 तर अलमट्टीतून 6 हजार 922 क्युसेक विसर्ग
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी,शिंगणापूर, रूई, भोगावती नदीवरील–खडक कोगे व वारणा नदीवरील-चिंचोली असे एकूण पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणात 54.204 टीएमसी पाणीसाठा असून 1 हजार 139 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर कर्नाटकातील अलमट्टी धरणात 91.130 टीएमसी पाणीसाठा असून 6 हजार 922 क्युसेक विसर्ग सुरू होता. जिल्ह्यात राधानगरी धरणात 171.59 (72%),तुळशी-56.59(58%),वारणा-677.42 (70%), दूधगंगा-497.07 (69%),कासारी- 55.37 (71%),कडवी 43.29( 61%),कुंभी 56 (73%),पाटगाव 79.75 (76%),चिकोत्रा 23.20 (54%),चित्री 29.91(56%),जंगमहट्टी 25.49 (74%),घटप्रभा 44.17(100%)जांबरे 23.23( 100%),कोदे (ल.पा.) 6.06(100%) दलघमी असा पाणीसाठा आहे. तसेच पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या पाणीपातळीत 4 फुटांची वाढ होऊन ती 15.1 फूट झाली होती. शिवाय सुर्वे 14.10, रुई-42.6, इचलकरंजी 37.6,तेरवाड-34.6,शिरोळ 26.6, नृसिंहवाडी-21,राजापूर-10 तर नजीकच्या सांगली 4.3 व अंकली 3.7 फूट अशी पाणीपातळी झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या