कोल्हापुरात सलग पाचव्या दिवशी कोसळधारा, राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

535

कोल्हापूर जिल्ह्यात आज पाचव्या दिवशीही शहरांसह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. मात्र आज जोर कमीच राहिला. दरम्यान, काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १३८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरणातही गेल्या चोवीस तासांत तब्बल ४ दलघमीने पाणीसाठा वाढुन तो ४३.९६ वर पोहोचला होता. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी सायंकाळी दोन इंचांनी कमी झाली होती.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. आज दिवसभरात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अधुनमधून सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पडलेला आणि आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारी नुसार, हातकणंगले- १२.१३, शिरोळ-८.२९, पन्हाळा-४३.२९, शाहूवाडी- ५३.६७, राधानगरी-३८.५०, गगनबावडा-१३८, करवीर-२९, कागल-२४.८६, गडहिंग्लज-२७, भुदरगड-३९.६०, आजरा-४१.५० आणि चंदगड तालुक्यात ७१.५० मिमी अशी पावसाची नोंद झाली.

दरम्यान राधानगरी धरणात काल ३९ दलघमी एवढा पाणीसाठा होता. आजच्या नोंदीनुसार यामध्ये ४ दलघमीची वाढ होऊन ४३.९६ दलघमी असा साठा होता. तर यामधुन पाण्याचा विसर्ग बंद होता. जिल्ह्यातील तुळशी -४७.०१, वारणा – ३२५.७८, दूधगंगा – २११.४२, कासारी – २३.६५, कडवी – ३०.३५, कुंभी – २७.५२, पाटगाव – २३.७९, चिकोत्रा -१३.८७, चित्री -१३.०५, जंगमहट्टी -९.५४, घटप्रभा -१४.१२, जांबरे-६.२९ तर कोदे (लपा) मध्ये १.३८ दलघमी असा पाणीसाठा होता.

पावसाचा किंचीत कमी झालेला जोर आणि धरणांतुन विसर्ग नसल्याने नद्यांची पाणी पातळी जैसे थे स्थिर होती. सायंकाळ पर्यंत पंचगंगा नदी वरील राजाराम बंधा-यावरील पाणीपातळी अवघ्या दोन इंचांनी कमी झाली होती. सकाळी १२ फुट १० इंच असलेली ही पाणीपातळी १२ फुट ८ इंच झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या