कोल्हापूर जिल्ह्यात ‘ऑक्सिजन’चा तुटवडा नाही, सात ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प नियोजित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात सध्या प्राणवायूचा तुटवडा नाही. शिवाय सात ठिकाणी जनरेटर प्रकल्प नियोजित करण्यात येत असून, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागातील सर्व जिह्यांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱयांची टीम पूर्णवेळ कार्यरत आहे.

‘कोल्हापूर ऑक्सिजन’कडून 25 मेट्रिक टन, बेल्लारी येथून 12 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख रिफिलरकडून वायुरूपात, तर पुणे येथील आयनॉक्स, तायो निप्पोन या मोठय़ा कंपन्यांकडून द्रवरूपात प्राणवायूचा थेट पुरवठा होत आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा नाही. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागातील सर्व जिह्यांना प्राणवायू उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱयांची टीम पूर्णवेळ कार्यरत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात पुढील काळात प्राणवायू ची कमतरता भासू नये, यासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजप्रमाणे सात ठिकाणी नव्याने ऑक्सिजन जनरेटर व वायुरूपात प्राणवायू सिलिंडरमध्ये भरण्याचे प्रकल्प पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सूचनेनुसार नियोजित असून, त्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्र, डेडिकेटेड कोविड रुग्णालय आणि अत्यावश्यक प्रसंगी वापरासाठी 10 लिटर क्षमतेचे अतिरिक्त 300 ऑक्सिजन कॉन्सण्ट्रेटर खरेदी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

प्रत्येक टँकरसोबत स्वतंत्र पोलीस एस्कॉर्ट

ठिकठिकाणहून प्राणवायूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार व निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा समिती पूर्णवेळ कार्यरत ठेवण्यात आली आहे. तर, बेल्लारी येथून प्राणवायूचा पुरवठा सुरळीत मिळण्यासाठी तेथे हेमंत निकम या उपजिल्हाधिकाऱयांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक टँकरसोबत एक स्वतंत्र पोलीस एस्कॉर्ट पुरविण्यात आलेले आहे. त्यामुळे प्राणवायूची वाहतूक जलद होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.