शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची रस्त्यावरची लढाई सुरू, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्कजाम

मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. काल रात्री उशिरा शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन पोलिसांनी नोटीस बजावल्या. त्या धुडकावून आज ठरल्याप्रमाणे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर जिल्ह्यातून एकवटलेल्या हजारो शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली. जमिनी आमच्या हक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या यासह सरकार विरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. सुमारे दोन तास चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान या महामार्गावर मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही एका उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने पुलावरून थेट पंचगंगा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केल्याने, वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. आंदोलनानंतर पोलिसांनी  विजय देवणे, राजू शेट्टी यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

कोणी मागणी केलेली नसताना सुद्धा नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग होऊ घातल्याने, यामध्ये कित्येक हेक्टर सुपीक शेत जमिनी जाणार असल्याने, शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीवेळी हा वादग्रस्त महामार्ग रद्द करण्याची घोषणा त्यावेळी सरकारने केली होती. पण राज्यात पुन्हा सरकार येताच हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यामुळे पुन्हा एकदा या शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली.धाराशिव सह ठिकठिकाणी मोजणीसाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले होते.तर गेल्या आठवड्यात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस खासदार विशाल पाटील, खासदार नागेश पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, आमदार दिलीप सोपल, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार प्रविण स्वामी आदींच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन बैठकीत एक जुलै रोजी कृषीदिनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे आंदोलन दडपण्यासाठी राज्य सरकारने दडपशाही करू नये. शिवाय पोलिसांनी मोजणीवेळी शेतकऱ्याकडून विरोध होताना यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही करण्यात आले होते.

दरम्यान आज चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रातोरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या प्रमुख नेत्यांना घरोघरी जाऊन पोलिसांकडून जिल्हा बंदीच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आल्या. त्या नोटीसांना न जुमानता आज जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी चक्काजाम आंदोलनासाठी पुणे बेंगलोर महामार्गावरील शिरोली जवळील पंचगंगा नदी पुलावर पोहोचले.तर या वादग्रस्त शक्तीपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सव्वा अकराच्या सुमारास प्रत्यक्ष चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली. माजी खासदार राजू शेट्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मारून चक्काजाम केले. तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरत, शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गास कडाडून विरोध केला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवी इंगवले,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील,राजू लाटकर,आर.के. पोवार,सतीशचंद्र कांबळे,प्रकाश पाटील,शिवाजी मगदूम, विक्रांत पाटील,दिलीप पवार,संदीप देसाई,बाबासो देवकर ,चंद्रकांत यादव,रघुनाथ कांबळे,अतुल दिघे आदीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या वारसांनी यापुढे खायचे काय? आता आम्हाला आमचे कुळ वाढवायचे नाही, आम्हाला आत्महत्या करू द्या, शेतकऱ्यांचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जात आहे.त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात असून,हजारो शेतकरी भूमीहिन होणार आहेत.त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने कंबर कसली आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी नुकतीच राज्य सरकारने वीस हजार कोटींची तरतूद केली आहे.भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्यात उद्रेक असून, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नका, अशा तीव्र भावना उमटत आहेत.

दरम्यान आज पंचगंगा नदी फुलावर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू होते सर्वत्र कडे कोट पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता.तरीसुद्धा दानोळी तालुका करवीर येथील एका शेतकऱ्याने पंचगंगा नदी पुलावरून थेट नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांसह अन्य शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याला आडविले.यावेळी शक्तीपीठ महामार्गामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने… आमच्या जमिनी गेल्या तर आमच्या वारसांनी यापुढे खायचे काय? आता आम्हाला आमचे कुळ वाढवायचे नाही,आम्हाला आत्महत्या करू द्या.. असा टाहो महायुती सरकारच्या नावाने फोडला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

पोलिसांची दमछाक, महामार्गावरील वाहतूक वळवली

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सततची वाहतूक वर्दळ असते.आजच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीनशेहून अधिक पोलिसांचा कडेकट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवली. कागलकडून पुण्याकडे जाणारी वाहने, लक्ष्मी टेकडी येथून पंचतारांकित एमआयडीसीमार्गे इचलकरंजी, हातकणंगले मार्गे सांगली आणि पेठवडगाव, वाठारमार्गे पुण्याकडे वळविण्यात आली होती. तर काही वाहने उजळाईवाडी येथून शाहूनाकामार्गे कसबा बावडा, शिये फाटा येथून पुण्याच्या दिशेने वळविण्यात आली होती. कागलच्या दिशेने जाणारी वाहने वाठार येथून पेठवडगाव, इचलकरंजीमार्गे पुढे कागलच्या दिशेने वळविण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना लांब पल्ल्याच्या अंतरावरून प्रवास करावा लागला.

शुक्रवारी विठ्ठलाला साकडे

दरम्यान शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालण्याचे आंदोलन हे दि‌. 4 जुलै रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.