कोल्हापूरी चपला झाल्या आणखी खास, मिळालं भौगोलिक मानांकन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पारंपारिक पोषाखावर घातलेली कोल्हापूरी चप्पल ही त्या पेहरावाची शान वाढवत असते. त्यामुळे कोल्हापूरी चपलांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापूरी चपलांना भौगोलिक मानांकन मिळालं आहे. महाराष्ट्रातील चार व कर्नाटकातील चार जिल्ह्यात तयार होणाऱ्या चपलांनाच कोल्हापूरी चपलांचा टॅग मिळणार आहे. या मानांकनामुळे आता कोल्हापूरी चपलांची ओळख जागतिक स्तरावर पोहोचणार आहेच त्यासोबत बनावट कोल्हापूरी चपलांना देखील आळा बसणार आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात तर कर्नाटकमधील धारवाड, बिजापूर, बागलकोट, बेळगाव या जिल्ह्यात तयार केलेल्या कोल्हापूरी चपलांनाच यापुढे कोल्हापूरी टॅग मिळणार आहे. या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर कुठेही तयार होणाऱ्या कोल्हापूरी चपला कोल्हापूरी म्हणून ओळखल्या जाणार नाहीत.

देशातील 326 उत्पादनांना आजपर्यंत भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 32 उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनात सोलापूरी चादर, पुणेरी पगडी, लासलगाव कांदा, जळगावची केळी, जळगावचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरच्या संत्र्यांसोबत आता कोल्हापूरी चपलांचा देखील समावेश झाला आहे.