कोल्हारच्या बंधाऱ्यास खालून भगदाड! लाखो लिटर पाणी जातेय वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हार

सुमारे 3 वर्षांपूर्वी प्रवाहित झालेला आणि दोन वेळा नादुरुस्त झालेला कोल्हार येथील प्रवरा नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यास काल खालून भगदाड पडून फुटल्याने बंधाऱ्यात अडविलेले पाणी वाहून जात आहे. त्वरित याची दखल पाटबंधारे खात्याने घेतली नाही तर कोल्हारचा बंधारा दोन दिवसात कोरडा होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सुमारे 2004 पासून प्रवरा नदीपत्रावरील बंधाऱ्याच्या कामास मुहूर्त लागला मात्र सदर काम तब्बल 12 वर्षे पूर्णत्वास गेले नाही. नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक पाठपुराव्याने 2016 साली बंधारा पूर्णत्वास जाऊन 15 फूट उंच व 9 प्लेटची क्षमता असणाऱ्या या बंधाऱ्यात सुमारे 13 फूट पाणी अडविले गेले. त्यामुळे याभागातील नदीकाठचा शेतकरी सुखावला. परंतु बंधाऱ्यांची 6 व 16 नंबर मोरी नादुरुस्त झाल्याने दोन वेळा त्याची दुरुस्ती करण्यात आली मात्र बंधाऱ्याच्या सुमारे 20 ते 25 टक्के काम अपूर्ण राहिल्याने आणि अबेसमेंट व्होलचे काम पूर्णत्वास न गेल्याने बंधाऱ्याला आतील बाजूने भगदाड पडून पाणी वाहून जात आहे.

बंधाऱ्याच्या मागील बाजूने मातीचा भराव आणि काँक्रीट ढासळल्याने बंधाऱ्यातील पाणी आता वेगाने वाहून जात आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात हा बंधारा कोरडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर बंधाऱ्यास 48 गाळे असून 432 फळ्या आवश्यक आहेत मात्र शासनाकडून अद्याप एकही फळीची पूर्तता झाली नसल्याचे समजते. तसेच पाटबंधारे खात्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याने याचा पाठपुरावा करण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्यानेच शेतकऱ्यांच्या हिताकरीता प्लेट टाकून पाणी अडविले आहे.

लातूरे अँड कंपनीने या बंधाऱ्याच्या काम केले असून सदरचे काम सुमार झाल्याची येथील शेतकऱ्यांची भावना आहे. बंधाऱ्याचे सुमारे 20 टक्के काम निधी अभावी रखडल्याचे बोलले जात आहे. यामध्ये बंधाऱ्याच्या साईडची व पूर्वेच्या बाजूची पिचिंग करणे बाकी आहे तसेच अबेसमेंटचे काम अपूर्ण आहे. काँक्रीट व लिकेज आदी अनेक कामे बाकी आहेत. अपूर्णावस्थेतील या बंधाऱ्याची कामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. बंधाऱ्यास भगदाड पडल्याचे समजताच डॉ विखे पाटील कारखान्याचे इस्टेट मॅनेजर प्रकाश खर्डे, संचालक पोपट उंबरकर, सिव्हिल इंजिनिअर गणेश तावडे आदींनी बांधाऱ्यास भेट देऊन पाण्याचे लिकेज काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले होते.

वाळू माफियाच कारणीभूत
प्रवरा नदी पत्रात वर्षानुवर्षे पोलीस व महसूल खात्याच्या आशीर्वादाने अद्यापही बेफाम अवैध वाळू उपसा होत आहे. दिवसभर गाढवांची वाळू भरण्याकरिता येथे जणू जत्राच भरते तर अंधार पडताच वाळू तस्करांची चार चाकी वाहने प्रवरामाईचे लचके तोडून वाळू उपसा करीत आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या भिंती जवळच वाळू तस्करांनी मोठमोठे खड्डे करून वाळू उपसा होत आहे. वेळीच अवैध वाळू उपशाच प्रतिबंध न केल्यास कोल्हारचा बंधारा वाळू माफियांच्या तस्करीने भविष्यात ढाणार यात किंचितही शंका नाही.