कोल्हारमध्ये दहशत पसरविणारा बिबटय़ा जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहाता तालुक्यातील कोल्हार शिवारात गेल्या महिनाभरापासून दहशत माजविणारा बिबटय़ा अखेरीस शुक्रवारी रात्री राजेंद्र आण्णासाहेब खर्डे यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱयात जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

कोल्हार व तिसगाव प्रवरा परिसरात रात्री-अपरात्रीच नव्हे, तर दिवसाही बिबटय़ा अनेकांच्या नजरेस पडत होता. येथील अनेकांच्या पशुधनावर त्याने हल्ला केला होता, त्यामुळे हा परिसर सतत बिबटय़ाच्या दहशतीखाली होता. वारंवार पिंजऱयाला हुलकावणी देणारा बिबटय़ा शुक्रवारी पहाटे अखेर भक्ष्याच्या आमिषाने राजेंद्र आण्णासाहेब खर्डे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱयात अडकला.

शनिवारी सकाळी सहा वाजता धनंजय खर्डे, कार्तिक खर्डे, धनंजय जामोदे यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱयांना माहिती दिली. हा नर बिबटय़ा सुमारे चार वर्षांचा असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हा बिबटय़ा या वस्तीवर सतत नजरेस पडत होता. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी तो खर्डे यांच्या दाराजवळील ओटय़ावर निवांत बसलेला दिसत असे. त्यामुळे खर्डे यांना तो खिडकीतून अवघ्या फूटभर अंतरावर दिसत असल्याने हे कुटुंब व वस्तीवरील नागरिक कायमच दहशतीत होते.