कोकणात जाणाऱ्या एसटीचे 17 मेपर्यंत बुकिंग फुल्ल, परीक्षांचे निकाल लागताच चाकरमानी गावाला…

विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होताच अनेक मुंबईकरांनी गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जाणाऱया चाकरमान्यांचे प्रमाण अधिक असून रेल्वेप्रमाणे एसटी गाडय़ांचे आरक्षण 17 मेपर्यंत फुल्ल झाले आहे. विशेष म्हणजे, एसटीच्या जादा गाडय़ांचेही तिकीट मिळेनासे झाले आहे. याचा लाभ उठवत खासगी ट्रव्हल्सवाल्यांनी प्रवाशांकडून दीडपट अधिक भाडे‘वसुली’ सुरू केली आहे.

उन्हाळी सुट्टीत मुंबईकरांचा कोकणातील गावी जाण्याकडे अधिक कल असतो. त्यासाठी सुट्टीचे नियोजन करीत रेल्वे आणि एसटीचे आरक्षण करण्यात येते. कोकण रेल्वेच्या बुकिंगसाठी तिकीट खिडक्यांवर होणाऱया गर्दीप्रमाणे आता एसटीच्या आरक्षण केंद्रांबाहेर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेतो एसटी महामंडळाने नियमित 114 गाडय़ांसह जादा गाड्या सोडल्या आहेत. महामंडळाच्या मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, मागाठाणे, पनवेल आगारातून जादा गाडय़ांचे नियोजन करण्यात आले आहे. 17 मेपर्यंत नियमित तसेच जादा गाडय़ांचेही आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

n एसटी महामंडळाने महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, माजी सैनिक यांना तिकीट दरात सवलत दिली आहे. त्यामुळे भाडेवाढ होऊनही यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रवासी संख्या वाढली आहे. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीदेखील महामंडळ जादा गाडय़ांचे नियोजन करणार आहे.

n रेल्वे तसेच एसटी गाडय़ा उपलब्ध न झाल्याने अनेकांना खासगी ट्रव्हल्सकडे वळावे लागत आहे. त्यांची निकड लक्षात घेत खासगी ट्रव्हल्सवाले 700 रुपये भाडे असलेल्या भागात जाण्यासाठी 1000 ते 1500 रुपये उकळू लागले आहेत.

श्रीवर्धन, दापोली भागात जाणाऱयांची संख्या अधिक

गावी कुटुंबीयांसह जाणाऱया चाकरमान्यांबरोबरच कोकणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जाणाऱयांची संख्या वाढली आहे. याचा एसटीच्या आरक्षणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. श्रीवर्धन, दापोली, मंडणगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, राजापूर या भागांत तुलनेत अधिक गाडय़ांची व्यवस्था करावी लागत आहे, असे मुंबई सेंट्रल आगारातील एका अधिकाऱ्याने सांगितले.