मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडले, देवगड-निपाणी मार्गावरील वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कालपासून सततच्या पडणा-या मुसळधार पावसामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोंडवली बोभाटेवाडी येथे रस्त्यालगतचा जुनाट महाकाय वटवृक्ष आज सकाळी 10.15 वा. च्या दरम्यान उन्मळून पडला. यामुळे देवगड-निपाणी राज्य मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

दरम्यान स्थानिकांकडून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले असून वटवृक्ष रस्‍त्‍यावरून हटवण्याचे काम स्थानिक युवकांच्या मदतीने युध्दपातळीवर सुरु आहे. या राज्य मार्गास जवळ चा पर्यायी मार्ग नसल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच अनेक नोकरदार, एस.टी.बस व अवजड वाहतूक करणारी वाहने अडकून पडली आहेत.

या धोकादायक वटवृक्षाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील स्थानिकांनी वारंवार निवेदन देऊनही विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. घटनेदरम्यान काही शाळकरी मुले व नागरीक रस्त्यावरून जात असताना हा वटवृक्ष कोसळला, मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही त्याचबरोबर वटवृक्षा शेजारी विद्युत प्रवाहित तारा व पोल असल्याने त्याचेही नुकसान झाले. यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला .