
रेड सोईल स्टोरीज फेम शिरीष गवस , (वय 32 वर्षे) यांचे गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना ब्रेन ट्यूमर हा आजार होता व त्यांच्यावर गेले पंधरा दिवस तेथे उपचार सुरू होते.
मुंबई येथील नोकरी व्यवसाय सोडून सिंधुदुर्गमध्ये शिरीष आणि पूजा गवस स्थायिक झाले होते. कोकण खाद्य संस्कृती, सण, रूढी-परंपरा या गोष्टी रेड सॉईल स्टोरीजच्या माध्यमातून जगापुढे आणत होते. त्यांना यासाठी कोकण सन्मान सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. सेवानिवृत्त निवासी नायब तहसीलदार सत्यवान गवस यांचे ते पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, बाबा, पत्नी, बहीण आणि एक वर्षाची मुलगी आहे. रेड सॉईल स्टोरीजच्या माध्यमातून सुरू असलेला शिरीष आणि पूजाचा सुखी संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला, अशी भावना शोकाकुलपणे सर्वत्र व्यक्त होत आहे. जुलै महिन्यातच शिरीष यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा झाला होता.