
सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी
26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनापासून रस्ता, पाणी व अन्य जीवनावश्यक सुविधा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या काळसे धनगरवाडी ग्रामस्थांमधील सहा जणांची तब्बेत खालावली आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपल्या न्याय मागण्यांसाठी मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडीतील ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. या उपोषणकर्त्यांची प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. दरम्यान आज बुधवारी जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने उपोषण स्थळी येत उपोषणकर्त्यांची तपासणी केली. यातील देऊ वरक, दीपक वरक, शुभम वरक, स्वप्नील वरक, दशरथ वरक, शाहू वरक या सहा उपोषणकर्त्यांची तब्ब्येत अधिक खालावल्याने त्यांना डॉक्टरने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाने उपोषणाची दखल घेऊन तात्काळ काम सुरु केले नाहीतर केव्हाही ‘कडेलोट’ करू, असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेतेय ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधीचाही दुर्लक्ष
गेले पाच दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या काळसे धनगरवाडी ग्रामस्थांच्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नाही. मात्र निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधींचा मतदार राजा असलेल्या या मतदारांची म्हणजेच ग्रामस्थांची जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी भेट घेतलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.
प्रशासन एवढे निष्क्रिय का?
सिंधुदुर्ग जिल्हा विकास आराखडा दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा बनविला जातो. तेवढा निधीही येतो. त्यातून प्रत्येक वाडीवस्तीवर सोयीसुविधा पोहोचविण्याच्या घोषणा लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मग काळसे धनगरवाडीतील ग्रामस्थांच्या वेदना व समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी हे प्रशासन एवढे निष्क्रिय का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांमधुन विचारला जात आहे.






























































