कोकणसाठी जाहीर विशेष गाडय़ांच्या संख्येत घट, मध्य रेल्वेचे नियोजन एका दिवसातच ढेपाळले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्टीतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत विशेष रेल्वे गाडय़ांची घोषणा केली. मात्र त्याला एक दिवस उलटत नाही तोच गाडय़ांच्या नियोजनात बदल केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव मार्गावरील विशेष गाडय़ांची संख्या कमी करण्यात आली. या मार्गावर 20 ऐवजी 18 फेऱ्या चालवणार असल्याचे मध्य रेल्वेने मंगळवारी जाहीर केले. या ढिसाळ नियोजनाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला.

मध्य रेल्वेने सोमवारी ट्रेन क्र. 01019/01020 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या चालवणार असल्याचे जाहीर केले होते. 5 एप्रिल ते 7 जूनपर्यंत विशेष गाडय़ा प्रवासी सेवेत धावतील, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी मध्य रेल्वेने विशेष गाडय़ांच्या संख्येत 20 ऐवजी 18 पर्यंत घट केली. विशेष म्हणजे, 3 ते 5 एप्रिलपर्यंत येणाऱ्या सलग सुट्टय़ांच्या अवधीतील दोन फेऱ्यांना मध्य रेल्वेने कात्री लावली. 5 एप्रिलच्या रविवारी प्रवाशांची गर्दी असण्याची शक्यता आहे. त्याच काळातील दोन फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. विशेष गाडय़ांचे नियोजन एका दिवसातच ढेपाळले आणि दोन फेऱ्या कमी कराव्या लागल्या ही रेल्वे प्रशासनाची नामुष्की आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली.

18 विशेष फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक

ट्रेन क्र. 01019 या साप्ताहिक विशेष गाडीची सेवा 5 एप्रिलऐवजी 12 एप्रिलला सुरू होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 5 एप्रिल ते 7 जूनदरम्यान ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवारी 12 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. याच कालावधीत ट्रेन क्र. 01020 साप्ताहिक विशेष गाडी 12 एप्रिल ते 7 जूनदरम्यान मडगाव येथून दर रविवारी दुपारी 4 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजून 50 वाजता पोहोचेल.