
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
ज्याठिकाणी घरासाठी चिरे आणून टाकले होते तिथेचं चिता पेटल्या आणि तिवरे भेंडवाडीतील कृष्णा धाडवे यांचे नवीन घराचे स्वप्न धरणाच्या पाण्याबरोबर वाहून गेले.
मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटून 24 जण वाहून गेले .त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले. उर्वरित 16 जणांचे मृतदेह सापडले असून सात जण अद्याप बेपत्ता आहे. भातशेती हे प्रमुख व्यवसाय असलेली काबाडकष्ट करणारा हा कष्टकरी समाज. त्यांची शिकलेली पुढची पिढी कामधंद्यासाठी मुंबई,पुण्यात अशी ओळख जपणारी तिवरे भेंडवाडी. यातच एक घर होत कृष्णा धाडवे यांचे. पाऊस कमी झाला की नवीन घर बांधायच होतं त्यांना. त्यासाठी त्यांनी अंगणात चिऱ्याचे दगड आणून ठेवले होते. पण धरणातील पाण्याच्या लोंढ्याने तेही वाहून नेले आणि धाडवे यांचे घराचे स्वप्नही भंगले.
सिलेंडर,चप्पल,दोडका
भेंडवाडीतील माणस, घरदारं धरणाच्या पाण्यात वाहून गेली. काही कुटूंबामध्ये एकमेकांचे अश्रू पुसायला सुध्दा कोणी जिवंत नाही. आज गावात स्मशान शांतता होती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेले कपडे, सिलेंडर, चप्पल,दोडका,नारळ पाहून उद्धवस्त झालेल्या भेंडवाडीची करूण कहाणी समोर दिसत होती.




























































