
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी विभागातील दिवानखवटी आणि खेड स्थानकादरम्यान युटीलिटी ट्रक व्हेईकल रूळांवरून घसरल्याचा अपघात रविवारी सकाळी सातच्या सुमारास घडला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्य़ा ‘तेजस एक्सप्रेस’सह अनेक गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
रत्नागिरी रिजनमधील दिवानखवटी स्थानकाजवळ वावे गावानजिक सकाळी 6.57 वाजता युटीलीटी ट्रक व्हेईकलच्या पुढची चाके घसरल्याने या मार्गावरील गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे अनेक गाडय़ांची वाहतूक नियंत्रित करण्यात आली, तरी काही गाडय़ांचे वेळापत्रक बदलण्यात आले. अपघाताने रूळांचे झालेले नुकसान दूर करण्यासाठी तातडीने दुरूस्ती सुरू करण्यात आली. ही दुरूस्ती पूर्ण होऊन ट्रक वाहतूकीसाठी फिट असल्याचे सर्टीफिकेट दुपारी 3.47 वाजता मिळाले. लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आलेल्या ‘तेजस एक्प्रेस’चा पहिलाच दिवस असताना तिला वीर स्थानकाजवळ थांबविण्यात आले. मांडवी, नेत्रावती आणि अन्य गाडय़ा चिपळून, रत्नागिरी स्थानकात थांबविण्यात आल्या. तसेच करमाळी ते सीएसएमटी तेजस एक्प्रेस रात्री 9.40 वाजता सात तास उशीराने सोडण्यात आली.




























































