
चालू मोटरसायकलवर पोलीस नाईक यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मोटरसायकल खाली पडली. ही घटना शहरातील नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रासमोर, रोडवर, कोपरगाव येथे घडली.
राजू तुकाराम चव्हाण (44) असे या मृत पोलिसाचे नाव आहे. ते कोपरगाव तालुका पोलीस स्थानकात नोकरीला असून मूळ रा.घुमटवाडी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर येथील आहेत. ही घटना बुधवारी रात्री 08:15 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानकापासून हजार मीटर अंतरावरील नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रासमोर, रोडवर घडली. मयत पोलीस नाईक यांचे नाव राजु तुकाराम चव्हाण व मामा प्रेमदास तारू पवार,(45 वर्षे), व्यवसाय एसटीवाहक, रा.वागळुज, ता. आष्टी, जि. बीड हे दोघेजण सोबत मोटारसायकलवरून जेवण करण्यासाठी जात असताना पोलीस नाईक चव्हाण यांनी मामाला गाडीवरून खाली उतरवले व दोन मिनिटात येतो, असे सांगून मोटारसायकल पुन्हा पाठीमागे वळवून घेऊन जात असताना हृदयविकाराचा झटका आला.
त्यामुळे त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण गेल्याने ती मोटारसायकल हळू करून एका बाजूस झुकून खाली पडला. मामाने ताबडतोब औषधोपचारातकरिता कोपरगाव येथील रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत झाल्याचे घोषित केले आहे. मयत पोलीस नाईक राजू चव्हाण यांचे मामा प्रेमदास तारू पवार यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्याप्रमाणे शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली भरत दाते पुढील तपास करीत आहेत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आणि पोलीस कर्मचारी यांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.




























































