कोरेगाव पार्कमधील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, सात मुलींची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर स्वारगेट पोलिसांनी धाड टाकली. तेथून 7 मुलींची सुटका करून दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क हद्दीत वेश्या व्यवसाय सुरू असतानाही कारवाई केली जात नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्वारगेट पोलिसांनी कारवाई केली आहे.

नूतन अमोल धवन (रा. केशवनगर) आणि रवी बलभीम जमादार (वय 25) यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे.

शहरातील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत. मात्र स्थानिक पोलिसांकडून कारवाईला फाटा दिला जात असल्याचे दिसून आले होते. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत लेन नंबर सातमध्ये स्काय स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्वारगेट पोलिसांना त्याठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी छापा टाकून सात मुलींची सुटका केली आहे मॅनेजर रवीला पकडले असून नूतन याच्या सांगण्यावरून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची कबुली त्याने दिली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वारगेट पोलिसांनी कारवाई केल्याने पोलीस दलात चर्चा रंगली आहे.

पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

कोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद पत्की यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, स्पा सेंटरमधील कारवाई आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली यामध्ये काहीही संबंध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.