
राजस्थानच्या कोटा येथील प्रताप नगर परिसरात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. चोरीच्या उद्देशाने एका घरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराची अवस्था अशी झाली की, तो घराच्या स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅनच्या छिद्रामध्ये अर्धा आत आणि अर्धा बाहेर अशा स्थितीत अडकून पडला होता. यावेळी घरचे मालक घरी आले तेव्हा त्यांना या सगळ्या प्रकाराबाबत माहिती मिळाली. हा प्रकार पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रताम नगर परिसरातील रहिवासी सुभाष कुमार रावत आणि त्यांची पत्नी मंदिरात गेले होते. घर बंद असल्याचा फायदा या चोरींनी घेतला. आणि ते घरात शिरले. यानंतर जेव्हा हे रावत दाम्पत्य रात्री उशीरा घरी आले. तेव्हा सुभाष कुमार यांच्या पत्नीने मुख्य गेट उघडले. त्याच क्षणी, स्कूटरचे हेडलाइट स्वयंपाकघरावर पडली आणि तेथील दृश्याने त्यांना धक्का बसला. एक तरुण त्यांच्या घरातील किचनमध्ये असणाऱ्या एक्झॉस्ट फॅनच्या छिद्रामध्ये अडकला होता. यावेळी या दाम्पत्यांनी आरडाओरडा सुरू केला.
सुभाष कुमार आणि त्यांच्या पत्नीने आवाज एकताच घराबाहेर पहारा देत असलेल्या चोराच्या साथीदारांपैकी एकाने ताबडतोब घटनास्थळावरून पळ काढला. मात्र छिद्रात अडकलेला चोर हालचालही करू शकत नव्हता. तो वेदनेने विव्हळत होता आणि बाहेर निघण्याच्या प्रयत्न करत होता. यावेळी सुभाष कुमार आणि त्यांच्या पत्नीचा आवाज ऐकून सर्व शेजारी तिथे जमा झाले आणि पोलिसांना याबाबात कळवण्यात आले. हा सर्व ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झाली होती.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी ज्या कारने आला होता, त्यावर पोलिसांचे स्टिकर लावल्याचे आढळून आले. यावेळी अधितक तपास करता हा तरुण गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान पोलिसांनी त्या चोराला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
एक्झॉस्ट फॅनचे छिद्र लहान असल्याने चोराला बाहेर काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच चोराने सुटकेचा निश्वास सोडला, मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चोराच्या या फजितीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.


























































