
कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्लाझ्माची आवश्यकता असलेले अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतायत. अशा गरजूंना वेळेत मदत मिळावी यासाठी लोकोबझ या डेटा अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्मने नुकतीच ‘कोविड हेल्पर’ साइट लाँच केली आहे.
शहरातील कोणत्या रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडस् उपलब्ध आहेत, रेमडेसीवीर कुठे मिळेल, प्लाझ्मा डोनर मिळेल का अशा आशयाच्या हजारो पोस्ट सध्या ट्विटरवर पडतायत. ट्विटरवरील या पोस्टची शहर आणि गरजेनुसार विभागणी करून https://covid.locobuzz.com या लिंकवर एकत्रित करण्यात आल्या आहेत, जेणेकरून गरजूंची माहिती स्वयंसेवी संस्थांना, समाजसेवकांना एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होईल. यामुळे गरजूंना वेळेत मदत मिळण्यास मदत होईल. मुंबई, नाशिक, दिल्ली, पुणे, बंगळुरू, चेन्नई आदी शहरांत ही सुविधा उपलब्ध आहे.























































