कोयनेतून पुन्हा विसर्ग सुरू, चार वक्र दरवाजे एका फुटाने उघडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याकडून राज्यातील विविध विभागांत जोरदार अतिवृष्टीचा देण्यात आलेला इशारा आणि तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाचा सुरू असलेला कहर यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पाणीसाठय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोयना धरणाचे 4 वक्र दरवाजे मंगळवारी 1 फुटाने उघडून 6 हजार 253 व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2 हजार 100 असा एकूण 8 हजार 353 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

पाटण तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोयना धरणाची पाणीधारण क्षमता संपल्याने आवक सुरू झाल्यास धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने सोमवारी रात्री 9 वाजता पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता वाढ करत हा विसर्ग 2 हजार 100 क्युसेकपर्यंत वाढवला. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता धरणाचे 4 वक्र दरवाजे 1 फुटाने उघडून 6 हजार 253 व पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.

धरणातील सध्याची पाणीपातळी 2162.11 फूट, 659.257 मीटर असून, पाणीसाठा 104.49 टीएमसी आहे. धरणात 2 हजार 100 क्युसेकने आवक होत आहे.