कोझिकोडे अपघातातील सहवैमानिकावर अंत्यसंस्कार, मृतदेह पाहून गर्भवती पत्नीची शुद्ध हरपली

1245

कोझिकोडेतील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे सहवैमानिक अखिलेश कुमार शर्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मृतदेह पाहून त्यांची नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडल्याची माहितीही मिळत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोझिकोडे येथील विमान अपघातात अखिलेश कुमार शर्मा यांचा मृत्यू झाला होता. ते या विमानाचे सहवैमानिक होते. दिल्ली येथे त्यांचे पार्थिव आणल्यानंतर ग्राऊंड स्टाफ आणि 200 वैमानिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजे मथुरा येथील गोविंद नगर येथे नेण्यात आलं होतं. त्यांची पत्नी मेघा या नऊ महिन्यांच्या गर्भवती असल्याने त्यांना अखिलेश यांच्या मृत्युबाबत आधी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. जेव्हा अखिलेश यांचं पार्थिव आणण्यात आलं, तेव्हा ते पाहून मेधा यांना विश्वास होत नव्हता. त्या वारंवार उपस्थितांना, हे माझे पती नाहीत, हे कोण आहेत? असं विचारत होत्या. अखिलेश या जगात नाहीत, या दुःखावेगाने त्यांची शुद्धही हरपल्याची माहिती शर्मा यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

हेही वाचा- दीपक साठेंनी कसे वाचवले प्रवाशांचे प्राण? सविस्तर पोस्टद्वारे भावाने सांगितले

मेघा यांच्या गर्भारपणाचे नऊ महिने पूर्ण झाले असल्याने अखिलेश यांनी त्यांना लवकरच भेटण्याचे वचनही दिले होते. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी मेघा यांच्याशी व्हिडीओ कॉल करून आपण लवकरच येऊ, असंही सांगितलं होतं. पण, नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं, अशी माहिती अखिलेश यांचे मेहुणे विजय यांनी दिली आहे.

ही बातमी वाचलीत का?- आईला आणखी नाही बोलता येणार, नीला साठे यांना हुंदका आवरला नाही

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत दुबईहून केरळ येथील कालिकत येथे येणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान शुक्रवारी करिपूर विमानतळावर लॅण्डिंगवेळी घसरले आणि अक्षरश: दोन तुकडे झाले. या भयंकर अपघातात किमान 17 प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच या विमानाचे दोन्ही वैमानिक कॅप्टन दीपक साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार शर्मा यांचाही मृत्यू झाला. कॅप्टन दीपक साठे यांनी अखिलेश कुमार शर्मा यांच्यासोबतीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 170 जणांचा जीव वाचला.

आपली प्रतिक्रिया द्या