आईला आणखी नाही बोलता येणार, नीला साठे यांना हुंदका आवरला नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आईला काही शब्द आहेत काय बोलायला…आई काय बोलणार आहे, सांगा तुम्ही? बस झाल…आणखी नाही बोलू शकणार, असे सांगताना नीला साठे यांना हुंदका आकरला नाही. कोझिकोडे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचे आई वडील येथील वसंत नगरात राहातात. आई नीला साठे 83 तर वडील वसंत साठे 87 वर्षांचे आहे. नीला साठे मोठ्या धीराने बोलल्या. पण, वडीलांना बोलताच आले नाही.

त्याने एवढय़ा लोकांचे प्राण वाचवले. पण, त्याचा स्वतःचा जीव गेला. परमेश्वरापुढे माथा टेकवण्या पलिकडे काही करू शकत नाही आपण… एअरफोर्स, एनडीए सगळीकडे टॉपर होता तो. आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला. आमची दोन्ही मुले सैन्यात होती. स्वोर्ड ऑफ ऑनर मिळालेला पहिला महाराष्ट्रीयन अधिकारी होता. वायुदलाची आठही बक्षिसे त्याने मिळवली होती. सर्व क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवले होते. मला काही बोलायला शब्दच नाही. देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात. पण, देवाने तारले कोणाला नि मारले कोणाला, असे म्हणत त्या निःशब्द झाल्या.