
सामना प्रतिनिधी । कराड
बाजारपेठेतील साखरेच्या दरामध्ये होणारे चढउतार आणि हुमणी, अपुरे पाणी यामुळे ऊसपिकावर झालेला परिणाम अशा अनेक कारणांमुळे सध्याचा काळ हा साखर उद्योगासाठी कसोटीचा काळ आहे. मात्र अशा परिस्थितीतही शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेऊन कृष्णा कारखाना दरात एक पाऊल पुढेच राहिल, असा विश्वास यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या 59 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
कृष्णा कारखान्याच्या 59 व्या गळीत हंगामास आज उत्साहात प्रारंभ झाला. चेअमरन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, संजय पाटील, सुजीत मोरे, गिरीष पाटील, ब्रिजराज मोहिते, अमोल गुरव, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, पैलवान शिवाजीराव जाधव, माणिकराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
साखर कारखानदारीसमोरची आजची आव्हाने स्पष्ट करताना डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले, की साखरेचा भाव शासनाने 2900 रूपये केला आहे. मात्र तो पुरेसा नसल्याने यामध्ये कारखान्यांना एफआरपी देण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. हाच दर 3300 रूपयेपर्यंत केल्यास साखर कारखानदारी अडचणीतून बाहेर येऊ शकते. शेतकरी संघटनांनी ऊसवाहतूक व कारखाने बंद पाडण्याऐवजी साखरेला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. दरम्यान, गेल्या हंगामातील उर्वरित बिलाची रक्कम दिवाळीपर्यंत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
साखर उद्योगाबाबत केंद्र व राज्य सरकारने अनुकूल धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट करून नामदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, की साखरेचे दर 3000 हून अधिक करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. एकीकडे साखरेचा साठा वाढत असला तरी दर कोसळत आहेत. अशा स्थितीत केंद्राने 6000 कोटींची मदत साखर उद्योगाला देऊ केलेली आहे. शेतकरी सभासदांनी आपला नोंदविलेला सर्वच ऊस कृष्णा कारखान्याला घालवून सहकार्य करावे असे आवाहन करून, कितीही अडचणीची परिस्थिती आली तरी शेतकरी सभासदांना अधिकाधिक पैसे देण्यासाठी कृष्णा कारखाना सदैव प्रयत्नशील राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभासदांना जास्तीत दर आणि कर्मचार्यांना जास्तीत जास्त पगार देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले हे काटेकोरपणे नियोजन करत आहेत. तसेच शेतकरी सभासदांचे उत्पादन वाढावे, यासाठी कारखाना विशेष प्रयत्न करत असल्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी संचालक धोंडिराम जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुमन जाधव यांच्या हस्ते वरदविनायक पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. यावेळी कराड तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पवार, पैलवान धनाजी पाटील, रेठरे बुद्रुक विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष व्ही. के. मोहिते, कृष्णा कामगार सोसायटीचे चेअरमन पैलवान आनंदराव मोहिते, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, बाळासाहेब पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रदीप थोरात, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक जाधव, माजी पं. स. सदस्य राजेंद्र पाटील, निवासराव पाटील, प्रमोद पाटील, रघुनाथआप्पा मोहिते, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, धनाजी जाधव, बी. के. शिंदे, बंटी जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.
दराबाबत येत्या आठवड्याभरात धोरण!
शेतकर्यांना जास्त पैसे मिळावेत हीच शासन व साखर कारखानदारांची भूमिका आहे. याच भूमिकेतून शेतकरी संघटनाही लढत आहेत. दरम्यान, कोल्हापूरात सुरू झालेल्या काही कारखान्यांत सध्या गाळप बंद आहे. सांगलीतही तशीच परिस्थिती उद्भवली असून, ऊसदराबाबत येत्या आठवड्याभरात योग्य धोरण स्पष्ट होईल, असे सुतोवाच डॉ. सुरेश भोसले यांनी केले.






























































