
प्रत्येक प्रांतात बाळकृष्णाला त्याच्या जन्मानंतर विविध पक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो. आपल्याकडे महाराष्ट्रातील नैवेद्य मात्र वैशिष्ठ्यपूर्ण असतो. राजस कृष्णाला साधेपणा अत्यंत प्रिय. त्याची दोस्त मंडळीही साधी भाबडी. घरून आईने करून दिलेली शिदोरी आणणारी. छोटा कृष्ण तरी वेगळे काय आणणार.. यशोदा आईने दिलेली शिदोरी घेऊन तोही त्याच्या गोधनास घेऊन आपल्या सवंगड्यांसोबत यायचा. दुपारी भूक लागल्यानंतर प्रत्येकाची शिदोरी उघडली जायची. कोणी भाकरी आणलेली असायची.. कोणी पोहे.. कोणी दही भात, कोणी ज्वारीच्या लाह्या..सगळ्या गोपालाना वाटायचे कि आपला पदार्थ कृष्णाने चाखून पाहावा. यावर कृष्णाने एक युक्ती केली. सगळ्या गोपांचे पदार्थ त्याने एकत्र केले आणि त्याचा काला तयार केला. या काल्याची चव प्रत्येकाला अगदी अवीट गोडीची लागली. हा काला कृष्णास अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे त्याचा जन्म झाल्यावर त्याला या काल्याचा नैवेद्य त्याला दाखविला जातो. उत्तरेकडे या काल्याला माखनमिष्टी म्हणतात.
काल्याची ही गोष्ट इथेच थांबत नाही. आषाढ शुद्ध दशमी ते आषाढ शुद्ध चतुर्दशी पालख्यांचा मुक्काम पंढरपुरात असतो. या मुक्कामी रोज सकाळी पादुकांची पूजा, दोन्ही वेळेस कीर्तन, रात्री जागर होतो. द्वादशीच्या दिवशी उपवास सोडतात.
वारकरी परंपरेत सर्व उत्सवांची सांगता गोपाळ काल्याने होते. आषाढ वारीही याला अपवाद नाही. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पालख्या गोपाळपुरला काल्यासाठी जातात. गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून 2 किमी अंतरावर आहे. टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. विविध दिंड्या, पालख्या पाहटेपासून येऊ लागतात. पूजा, कीर्तन झाल्यानंतर पालखीसमोर काल्याचे कीर्तन होते. हा काला सर्व वारकरी प्रसाद म्हणून भक्षण करतात. त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होते. मग पालखी पुन्हा पंढरपुरात परत येते.
गोपाळ काला –
साहित्य – पोहे, साळीच्या लाह्या, चुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, फुटाण्याचे डाळे, कैरीचे लोणचे, लिंबाचे गोड लोणचे, दही, ताक, साखर, मीठ, तुपाची फोडणी.
कृती – पोहे धुवून घ्यावेत. लाह्या, पोहे एकत्र करून त्यात दोन्ही लोणची घालावीत. डाळींबाचे दाणे, आवडीनुसार फळांचे तुकडे घालावेत. आले, दोन हिरव्या मिरच्या वाटून घालाव्यात. ताक, दही घालून सरसरीत कालवावे. वरून तूप जिऱ्याची फोडणी द्यावी. अतिशय चविष्ठ असा काला केळीच्या पानावर घेऊन खावा.




























































