
एक्सप्लेनेड क्रिकेट क्लब आयोजित समर व्हॅकेशेन क्रिकेट शिल्ड स्पर्धेत केआरपी एकादश संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत केआरपी एकादश संघाने गौड युनियन क्रिकेट क्लबचा सहा विकेट्सनी पराभव करत विजय निश्चित केला. गौड युनियन क्रिकेट क्लबचे 139 धावांचे आव्हान केआरपी क्रिकेट क्लबने 140 धावा करत सहज पार केले.
सुरुवातीला योगेश पवारच्या 65 धावांच्या अर्धशतकी खेळी मुळे गौड युनियन क्रिकेट क्लबने समाधानकारक धावसंख्या उभारली. केआरपी संघाचा कर्णधार मनीष रावने 25 धावा देत चार फलंदाज बाद केले. उत्तरादाखल समीरध भट्टने अर्धशतकी 62 आणि मनीषने फलंदाजीतही छाप पाडताना नाबाद 29 धावा बनवून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अष्टपैलू खेळ करणाऱया मनीष रावची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली, तर योगेश पवारला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले. विजेत्यांना मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव उन्मेष खानविलकर, माजी उपाध्यक्ष संजय नाईक, सी.एस. नाईक यांच्या हस्ते खेळाडूंना गौरवण्यात आले.



























































