
कुडाळ तालुक्यातील वालावल कोचरेकरवाडी येथील कर्ली खाडीपात्रात बेपत्ता झालेल्या अनिकेत सुभाष कोचरेकर (28) या युवकाचा मृतदेह मंगळवारी सापडला. कुडाळ येथे मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.
वालावल कोचरेकरवाडी येथील खाडी पात्रात सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास अनिकेत कोचरेकर बेपत्ता झाला होता. याची माहिती निवती पोलीस ठाण्यात मिळताच निवती पोलीस ठाण्याचे स.पो.निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप गोसावी, विद्याधर लोणी, होमगार्ड प्रकाश खरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने या युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सोमवारी अनिकेतचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.
मंगळवारी सकाळीच अनिकेतचा मृतदेह येथील खाडी पात्रात आढळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. निवती पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेतला. अनिकेतच्या पश्चात वडील, बहीणी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



























































